पणजी : गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या मनोहर पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने गोव्यावर शोककळा पसरली आहे. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत गोव्यासाठी झगडणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होतेय. आपल्या साधेपणाने पर्रीकर यांनी जनतेच्या मनात स्थान मिळवलं. लोकांच्या मनातलं ते स्थान त्यांनी अगदी अखेरपर्यंत टिकवलं.
काही दिवसांपूर्वीच मनोहर पर्रीकर यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी कर्करोगाशी दोन हात करत असलेले पर्रीकर साऱ्या देशाने पाहिले. राजकारणात जिथे अनेकांना साधेपणा 'दाखवावा' लागतो, तिथे पर्रीकरांना त्याची कधी गरज वाटली नाही. कारण, त्यांचा साधेपणा कधीच दिखाऊ नव्हता. तर तो त्यांचा स्वभाव होता. त्यात ना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने फरक पडला ना देशाचे संरक्षण मंत्री झाल्यावर. त्यामुळे गोव्यात फिरताना, बाजारात जाताना ते स्कुटरवरून जायचे. लग्नाला गेल्यावर इतरांसारखे रांगेत उभे राहायचे. जिथे साध्या सरपंचाचा मुलगा, माझा बाप कोण आहे माहीत नाही का, असं विचारतो. चाचाजी विधायक है हमारे असं म्हणत जिथे माज दाखवला जातो, त्या देशात एखादा मुख्यमंत्री इतका साधा आणि नम्र असू शकतो, याचं अनेकांना आश्चर्य वाटायचं.
गोव्याला स्थैर्य मिळवून देण्यात पर्रीकरांचा सिंहाचा वाटा आहे. कायम राजकीय अस्थिरता अनुभवणाऱ्या गोव्याने पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली स्थैर्य अनुभवलं. याचा मोठा फायदा गोव्याला झाला. आयआयटीमधून शिक्षण पूर्ण झाल्याने त्यांना विकासाचं महत्त्व ठावूक होतं. उच्चशिक्षित तरुण राजकारणात आल्यावर काय घडू शकतं, हे गोवेकरांनी पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली अनुभवलं. त्यामुळेच आरोपांचे शिंतोडे त्यांच्यावर कधीच उडाले नाहीत. उलट ज्यावेळी गोव्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही, त्यावेळी छोट्या पक्षांनी पर्रीकर यांना दिल्लीतून गोव्यात आणण्याची मागणी केली. त्यावेळी पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री होते. पर्रीकरांना गोव्यात आणा, त्यांना मुख्यमंत्री करा, तरच पाठिंबा देऊ, या अटीवरच छोट्या पक्षांनी भाजपाला पाठिंबा दिला.
गोवेकरांनी पर्रिकर यांच्यावर भरभरून प्रेम केलं. कारण पर्रीकर यांच्या मनातही गोव्याबद्दल, गोवेकरांबद्दल प्रचंड आस्था होती. मोदी सरकारमध्ये संरक्षण मंत्री असतानाही त्यांची राज्यावरची माया तसूभरही कमी झाली नाही. घार उडते आकाशी चित्त तिथे पिलापाशी, अशीच पर्रीकर यांची दिल्लीत असतानाची अवस्था होती. पर्रीकर यांची गोव्यावरील माया शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली. कर्करोगाशी संघर्ष करत असतानाही पर्रीकर राज्यासाठी अथकपणे काम करत राहिले आणि हेच काम करता करता त्यांनी गोव्याचा अखेरचा निरोप घेतला.