Join us

मनोज जैनसह तिघांचे जामीन फेटाळले

By admin | Published: July 08, 2016 2:06 AM

सुमारे २३ हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणातील मुख्य आरोपी एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीचा माजी संचालक मनोज जैन, व्यवस्थापक राजेंद्र डिमरी आणि माल टेम्पोतून

ठाणे : सुमारे २३ हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणातील मुख्य आरोपी एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीचा माजी संचालक मनोज जैन, व्यवस्थापक राजेंद्र डिमरी आणि माल टेम्पोतून इतरत्र नेणारा बाबा धोत्रे या तिघांचेही जामीन अर्ज ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एच. पटवर्धन यांनी गुरुवारी फेटाळले. तिन्ही आरोपी सकृतदर्शनी या संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याचे मतही न्यायालयाने या वेळी नोंदवले. इफेड्रीन हे सबस्ट्रॅक्ट ड्रग असून त्याचा औषधनिर्मितीमध्ये उपयोग होतो, असा दावा करून आरोपींनी न्यायालयाकडे जामिनाची मागणी केली होती.ठाणे पोलिसांनी सोलापूरच्या एव्हॉन कंपनीवर छापा टाकून इफेड्रीनचा मोठा साठा जप्त केल्यानंतर जैनसह १० जणांना अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातील जैन, डिमरी आणि धोत्रे या तिघांनी जामीन मिळवण्यासाठी ठाणे विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर गेल्या दोन आठवड्यांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. विशेष न्यायालयाने यापूर्वीच सुशील असीकन्नन या फरारी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. जैन इफेड्रीनचा उत्पादक असून त्याच्याच माध्यमातून या तस्करीचे काम बिनबोभाटपणे सुरू होते. कंपनीत निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम करणारा डिमरी याने इफेड्रीनच्या निर्मितीपासून ते तस्करीपर्यंत अनेक प्रकारे मनोजला मदत केली. तर धोत्रे हा स्थानिक ‘दादा’ असून त्याने मालाची वाहतूक करण्यासाठी टेम्पो आणि काही मजूरही पुरवले, असे या तिघांवर आरोप आहेत. मात्र, अ‍ॅड. एच. एच. लाला आणि अय्याज खान या आरोपींच्या वकिलांनी इफे ड्रीन हे सबस्ट्रॅक्ट ड्रग असून त्यापासून औषधनिर्मिती केली जाते, असा दावा केला. ठाणे पोलिसांनी पकडलेल्या ड्रगच्या किमतीही फुगवल्याचा तसेच यामध्ये सनसनाटी निर्माण करण्यासाठी अभिनेत्री ममता कुलकर्णीचे नाव नाहक गोवल्याचा दावा केला. तसेच इफेड्रीनच्या रासायनिक तपासणीतही अमली पदार्थ आढळले नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. या सर्व आरोपांना विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी जोरदार आक्षेप घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. इफेड्रीनमध्ये फॉस्फरसची एक काडीही मिसळली तरी मेथ तयार होते. मेथपासून वेगवेगळे अमली पदार्थ तयार केले जातात. औषधनिर्मितीचा परवाना होता, पण त्याचा दुरुपयोग केला गेला, हेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पोलीस हे समाजहिताला बांधील आहेत. त्यामुळे एखाद्या अभिनेत्रीचे नाव घेऊन प्रकरण वाढवण्याचाही प्रश्नच नसल्याचेही अ‍ॅड. हिरे यांनी न्यायालयाला पटवून दिले. पडताळणी करून न्या. पटवर्धन यांनी जामीन फेटाळला. (प्रतिनधी)