लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील येत्या २० जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. योग्य उपोषण स्थळासाठी मुंबईतील मैदानांची जरांगे यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पाहणी केली.
मराठा समाजाला तत्काळ आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर उपोषणे, आंदोलने आणि सभा घेत आहेत. येत्या २० जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी प्राथमिक स्तरावर आझाद मैदान निश्चित करण्यात आले आहे. मात्र, मुंबईतील कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क मैदानाचा आग्रह धरला आहे. तेव्हा सोयीचे मैदान कोणते असावे, हे पाहण्यासाठी जरांगे यांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील शिवाजी पार्क, आझाद मैदान आणि बांद्रा कुर्ला संकुल येथील मैदानाची पाहणी केली.
मुंबईत उपोषणाला राज्यभरातून मराठा समाज येणार आहे. मुंबईचा दौरा रद्द होणार नाही. जालन्यासह विविध भागांतून मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. मोठ्या संख्येने समाज येणार असल्याने मुंबईतील सर्व मैदाने आम्हाला लागणार आहेत. तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक येतील, असा विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला असल्याचे शिष्टमंडळाचे म्हणणे आहे.