Join us

थेट शेतातून... मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला; जरांगेंसह मराठा समाजाला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 5:07 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा समाज मागास कसा आहे

मुंबई - एकीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर आले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील मूळ गावी जाऊन शेतात काममग्न झाले आहेत. त्यामुळे, मराठा आरक्षणाचा लढा किंवा तिढा कसा सुटणार असा प्रश्न महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेला पडला आहे. मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून मुंबईत जाऊन आपण उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे, सरकारच्या भूमिकाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शेतातून मनोज जरांगेंना आंदोलन टाळलं पाहिजे, असे आवाहन केलंय. तसेच, मराठा समाज बांधवांनाही सर्व्हेबाबत आवाहन केलं आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा समाज मागास कसा आहे, याबाबत मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शनाखाली १ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन टिकणारे आरक्षण देण्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच, मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला प्रतिसाद देत मराठा समाज बांधवांनी आपली माहिती सर्वेक्षणाच्या फॉर्ममध्ये द्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून टीम सर्वेक्षण पूर्ण करेल. संबंधित संस्था या सर्वेक्षणाचं एनॅलिसीस करेल. मराठा आरक्षणाचा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सरकारला सादर होईल. त्यानंतर, विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाईल. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टीकणारं आरक्षण दिलं जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी थेट आपल्या गावातील शेतातून जरांगेंना आणि मराठा समाजाला आवाहनही केलं. 

क्युरेटीव्ह पिटीशनबाबतीतही सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. सुदैवाने ती याचिका दाखल झाली आहे. मराठा समाजाला आज ओबीसीप्रमाणे सवलती दिल्या जात आहेत, सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाला ह्या सुविधा मिळत आहेत. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुविधा दिल्या जात आहेत. हॉस्टेल आणि निर्वाह भत्ताही देत आहोत. म्हणून, जरांगे पाटलांना आवाहन आहे की, सरकार मराठा समाजाच्या बाजुने आहे, सकारात्मक आहे. त्यामुळे, आंदोलन टाळलं पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

उद्धव ठाकरेंवर निशाणा

राज्य सरकार जोमाने काम करत आहे, सरकारला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. अनेक योजनांना केंद्र सरकारने पैसे दिले आहेत. आजपर्यंत असं कधी झालंय का, की भूमिपूजन आणि उद्घाटन एकाच व्यक्तीने केलंय. पण, आज तसं होत आहे. त्यासाठी, नियत आणि नितीमत्ता साफ लागते. ही त्यांची पोटदुखी आहे. मोदी आले की त्यांना पोटदुखी सुरू झाली. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनचं सरकार बुलेट ट्रेनच्या स्पीडनं काम करतेय, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  

शिष्टमंडळाची भेट, मुंबईतील आंदोलनावर ठाम

मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना परवानगी नाकारली आहे. असे असले तरी मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यातून मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. तसेच, वाटेत शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काहीवेळापूर्वी जरांगे यांची काही अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. या बैठकीत त्यांना मोठे शिष्टमंडळ येत असल्याचे सांगितले होते. परंतु जरांगेंनी मुख्यमंत्र्यांनी, दोन उपमुख्यमंत्र्यांनी यावे असे आवाहन करत आपण दुपारपर्यंत लोणावळ्यात थांबल्याचे स्पष्ट केले होते. मला मुंबईला यायची हौस नाहीय. इथेच आरक्षण मिळाले तर तिकडे येऊन काय करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  

 

टॅग्स :एकनाथ शिंदेमनोज जरांगे-पाटीलमुंबईमराठा आरक्षणमराठा