Join us

मनोज जरांगे पाटील, भाजपपासून सावध राहा; गद्दारांची खोक्यांची लंका जाळणारच: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 5:58 AM

दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क मैदानात  उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचे समर्थन करत, राज्य सरकारवर सडकून टीका केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : समाजात जातीपातीच्या भिंती उभ्या करून, त्यांना आपापसात झुंजविण्याचे कारस्थान भाजप करत आहे. आपल्या सगळ्यांना मिळून त्यांचे कारस्थान मोडून काढायला हवे. लग्नाच्या जेवणाला जायचे आणि नवरा-बायकोत भांडणे लावून दुसऱ्या लग्नाचे जेवण जेवायला जाणारी कपटी, कारस्थानी वृत्ती म्हणजे भाजप आहे. हा विघ्नसंतोषी पक्ष आहे. हे जिथे जातात, तिथे सत्यानाश करतात, तेव्हा जरांगे-पाटील भाजपपासून  सावध राहा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले. दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क मैदानात  उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचे समर्थन करत, राज्य सरकारवर सडकून टीका केली.

निकालाआधी निवडणुका घ्या 

हिंमत असेल, तर न्यायालयाच्या अपात्रतेच्या निकालाआधीच मुंबई महापालिकेसह विधानसभा व लोकसभेची निवडणूक एकत्र घेऊन दाखवा. जनतेचा निकाल जो असेल, तो आम्हाला मान्य असेल, असे आव्हान देत, ठाकरे यांनी ललकारले.

सर्वांना न्याय मिळायला हवा

जरांगे पाटील यांचे अत्यंत समजूतदारपणे आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत सोडविला जाईल, अशी अपेक्षा होती. न्यायालयाचा निकाल बदलण्याचाही अधिकार संसदेला आहे. त्यामुळे सगळ्यांना न्याय देणारा निर्णय संसदेत होईल, असे वाटले होते. मराठा, धनगर, ओबीसी आणि वंचित जाती सर्वांना न्याय मिळायला हवा, असेही ठाकरे म्हणाले.

मी घराणेशाहीचा पाईक...

घराणेशाहीचा पाईक असल्याचे सांगताना, त्यांनी जे कुटुंबव्यवस्था मानत नाहीत, त्यांनी घराण्यांबद्दल बोलू नये. आगापिछा नसलेल्या हिटलर, मुसोलिनी, गद्दाफी यांसारख्या शासकांच्या हाती देश गेल्यावर काय होते, हे जगाने पाहिले आहे. त्यामुळे कोणाला निवडायचे, याचा निर्णय जनतेने करायचा असल्याचेही ठाकरे म्हणाले.

 

टॅग्स :दसराउद्धव ठाकरे