मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण मिळत असून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जाळपोळ झाली, त्यातच आज सकाळी मंत्रालयाजवळ असलेल्या आमदार निवासाजवळ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या तोडफोड प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसात्मक घटनांशी संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन, जरांगे पाटील यांनी टीका केली. आता, जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर भाजपा आमदार नितेश राणेंनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर, जरांगे पाटील यांनीही पलटवार केला आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मात्र, हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही, असं गृहमंत्र्यांनी बजावलं आहे. गृहमंत्र्यांच्या या विधानावर आता मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया देत टीका केली. तर, मोदींवरही निशाणा साधला. त्यानंतर, भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट व्हिडिओच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पहिल्या दिवसापासून शांततेची भाषा करणारे जरांगे पाटील आता राजकीय बोलू लागले आहेत. ज्या समाजकंटकांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला, लोकांची घरं जाळली, आमदारांची घरं पेटवली, तोडफोडो केली. त्याविरुद्ध उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडक भूमिका घेतली. त्या भूमिकेचं समर्थन करण्यापेक्षा जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. याचा असा अर्थ होतो का, जरांगे पाटील या हिंसेचं समर्थन करत आहेत, त्यांची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येत आहे? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला. तसेच, जर, असं होत असेल तर राज्य सरकार म्हणून याबाबत आम्हाला विचार करावाच लागेल, असेही त्यांनी जरांगे पाटील यांना सुनावलं आहे.
राणे साहेबांनी बोलू नये
"आता राणे साहेबांनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. काल माझ्याशी फोन करुन गोडगोड बोलतात. पण आता याच्यापुढे बोलू नका," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यानंतर पत्रकारांनी प्रसाद लाड यांनी तुमचा बोलवता धनी कोण आहे असा प्रश्न विचारल्याचं पत्रकाराने सांगितलं. यावर संतापलेल्या स्वरात जरांगे पाटलांनी, "त्याला भेटल्यावर सांगतो मी बोलवता धनी कोण आहे आणि काय आहे," असं उत्तर दिलं.
जशास तसे उत्तर देऊ - जरांगे
मराठा तरुणावर खोटे गुन्हे दाखल करू नका, महाराष्ट्र शांत आहे, सरकारचे लोक गोंधळ घालत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी, जिल्हाधिकाऱ्यांसमोर बसेन. त्यावेळी ५ लाख येतील, अथवा १० लाख आंदोलक येतील, मला त्याची काळजी नाही. लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला आंदोलन करु द्या, नाहीतर उद्या मी स्वत: तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. मराठे काय असतील हे तुम्हाला मग कळेल. मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशासतसे उत्तर देऊ, असा इशाराही मनोज जरांगेंनी यावेळी दिला.
रात्रीपर्यंत ठोस निर्णय घ्या: मनोज जरांगे पाटील
शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आज रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.