Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मुंबई- मराठा आरक्षणच्या मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईकडे येत आहेत. आज हा मराठा बांधवांचा ताफा मुंबईत येणार आहे. गेल्या सहा दिवसांपासून जरांगे पाटील यांचा प्रवास सुरू आहे. सरकारकडून जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे.
" आरक्षणाबाबत तोडगा निघेल अस काही वाटत नाही, मनोज जरांगे पाटील यांनी वैयक्तीक जेवण्यापेक्षा मी त्यांनी सर्वांसोबत पक्तीत जेवण्याचा सल्ला देतो. कारण राजकारणी काहीही करु शकतो. चार पाच जणांच्यात जरांगे पाटील यांच्या जेवणात औषध टाकलं जाऊ शकतं. त्यांची तब्येत बिघडवण्यासाठी काहीही केलं जाऊ शकतं, अशी भितीही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आझाद मैदानावर स्टेज उभारण्याची तयारी सुरू
"सरकार फक्त चॉकलेट देण्याचे काम करत आहे. सरकारने प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. चॉकलेट ओळखणारी लोक आहेत. माझी भूमिका अशी आहे, ओबीसींचे वेगळं आणि गरीब मराठ्यांचं वेगळं आहे. त्या पद्धतीने त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी एक राजकीय भूमिका घ्यावी लागणार आहे. ओबीसीने भाजप आपला तारणकर्ता नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जरांगे पाटील यांना पोलिसांनी परवानगी नाकारली
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालनाच्या अंतरवाली सराटी येथून काढलेला मोर्चा आता काही तासांत मुंबईत पोहचणार आहे. परंतु मुंबईच्या आझाद मैदानावर पोलिसांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. मात्र मराठा समन्वयकांनी आझाद मैदानात स्टेज उभारण्यासाठी नारळ फोडत तयारीला सुरुवात केली. मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीला मुंबईत पोहचतील त्यानंतर सकाळी ध्वजारोहण करून मराठा आंदोलनाला सुरुवात होईल. याठिकाणी मंच उभारला जात आहे. आम्ही अर्ज आधीच दिले होते अशी माहिती मराठा समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिली.