जरांगेंचे आरोप गंभीर, देवेंद्र फडणवीसांचीही SIT चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 01:15 PM2024-02-27T13:15:13+5:302024-02-27T13:45:40+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारविरोधात आक्रमक होत देवेंद्र फडणवीस यांचीही एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Manoj Jaranges allegations are serious Nana Patole demands SIT investigation of Devendra Fadnavis | जरांगेंचे आरोप गंभीर, देवेंद्र फडणवीसांचीही SIT चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी

जरांगेंचे आरोप गंभीर, देवेंद्र फडणवीसांचीही SIT चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी

Congress Nana Patole ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या घणाघाती आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात मोठा गोंधळ उडाला. भाजप आमदारांनी जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीची मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी एसआयटी गठीत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारविरोधात आक्रमक होत देवेंद्र फडणवीस यांचीही एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

'मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे फडणवीसांचीही एसआयटीद्वारे चौकशी व्हायला हवी,' अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने मनोज जरांगेंसोबत चर्चा करत होते. या चर्चेचा तपशील त्यांनी सार्वजनिक करायला हवा, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

जरांगेंचे काय आहेत फडणवीसांवर आरोप?

मनोज जरांगे पाटील यांनी २५ फेब्रुवारी रोजी अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर आरोपांची राळ उडवून दिली. "मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा कट देवेंद्र फडणवीसांनी रचला होता. त्यामुळेच मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मला मारायचंच असेल, तर मी तुमच्या सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवा," असं जरांगे यांनी म्हटलं होतं. तसंच मला बदनाम करण्यासाठी माझ्या जवळच्या लोकांनाच देवेंद्र फडणवीस मुंबईला बोलवत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

फडणवीसांनी आज सभागृहात काय भूमिका घेतली?

देवेंद्र फडणवीस यांनी आज कठोर शब्दांत मनोज जरांगेंचा समाचार घेतला आहे. "एसआयटी गठीत करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल. मला या विषयावर बोलायचे नव्हते, पण बोलावे लागत आहे. मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले. ते हायकोर्टात टिकविले आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकवलं. या संपूर्ण काळात सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी अनेक उपाय केले आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झाला आणि आजही होतो आहे. त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे उभा राहिला आणि आहे. पण मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार? कुणाकडे बैठक झाली, कुणी दगडफेक करायला सांगितली, ते आता आरोपी सांगत आहेत. या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील? तुम्ही राजकारण कुठल्या स्तराला घेऊन निघाले आहात? कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देते आहे? हे सारे समोर येते आहे आणि येईलच. मला जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधून काढले जाईल. छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत वॉररूम कुणी सुरू केल्या, हेही तपासात पुढे येते आहे. एक नक्की हे संपूर्ण षडयंत्र पुढे आणले जाईल. अशी शिवीगाळ कुणालाही झाली, मग ते विरोधक का असेना, तर त्याच्यासोबत उभा राहणारा हा देवेंद्र फडणवीस पहिला असेल," अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

Web Title: Manoj Jaranges allegations are serious Nana Patole demands SIT investigation of Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.