इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमुळे होतोय भारतीय मूल्यांचा -हास - मनोज जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:44 AM2018-06-27T02:44:28+5:302018-06-27T02:44:32+5:30
इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमुळे मुले यंत्रमानव होऊ लागली असून, भारतीय मूल्यांचा -हास होऊ लागला आहे.
मुंबई : इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमुळे मुले यंत्रमानव होऊ लागली असून, भारतीय मूल्यांचा -हास होऊ लागला आहे. त्यामुळे मुलांवर संस्कार होऊन त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याची गरज अभिनेते मनोज जोशी यांनी व्यक्त केली आहे. हेमा फाउंडेशनने तयार केलेल्या नैतिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या ४ वर्षांच्या अभ्यासक्रमाचे सोमवारी प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये लोकार्पण करताना ते बोलत होते.
या वेळी मुंबई भाजपाचे सचिव संजय उपाध्याय, बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. संजय मालपाणी, मानसोपचार तज्ज्ञ चिनू अग्रवाल, हेमा फाउंडेशनचे विश्वस्त महेंद्र काबरा, विश्वस्त अनिता माहेश्वरी आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिनेते जोशी म्हणाले की, आपल्याकडे पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धती होती. त्यामधून विद्यार्थ्यांवर शिक्षणासोबत संस्कारही घडत होते. मात्र, इंग्रजांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर, प्रथम आपल्यावर मार्क्सवादी शिक्षणपद्धत लादली. या पद्धतीमुळे भारतात केवळ यंत्रमानव तयार होत आहेत. याउलट गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाºया भारतीय संस्कृती, मूल्यांचा आणि संस्कारांचा या पद्धतीत अभाव दिसतो. म्हणूनच आजच्या पिढीला आपल्या मूल्यांचा विसर पडला आहे. मनुष्याने मनुष्यासाठी काम करायला पाहिजे, याचे साधे भानही लोकांमध्ये नाही. टक्क्यांमध्ये अडकलेली शिक्षणपद्धती विचार निर्माण करण्याचे कार्यच करत नाही. म्हणूनच मूल्यांचा ºहास झाल्याची खंत जोशी यांनी व्यक्त केली. हेमा फाउंडेशनने ३२ मूल्यांवर तयार केलेल्या लघुपटांचेही जोशी यांनी कौतुक केले. या लघुपटांतून मुलांवर संस्कार घडतील, ते एक चांगले नागरिक होतील आणि समृद्ध भारत होण्यास हातभार लागेल, असेही ते म्हणाले.
फाउंडेशनचे विश्वस्त महेंद्र काबरा यांनी लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने हे पाऊल असल्याचे मनोगत व्यक्त केले, तर डॉ. संजय मालपाणी यांनी मुलांवर मातृभाषेतून संस्कार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.