मुंबईः शिवसेना-भाजपाचं जागावाटप निश्चित झालं असतानाही ईशान्य मुंबईतून कोणाला उमेदवारी द्यायची याचं घोडं अद्यापपर्यंत अडलं होतं. किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता, त्यानंतर आता भाजपाकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यावर पडदा पडला आहे. भाजपानं शिवसेनेच्या दबावाला झुकून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे मनोज कोटक यांच्या उमेदवारीला शिवसैनिकही अनुकूल आहेत. शिवसेनेनं विरोध केल्यानंतर भाजपाकडून प्रवीण छेडा, प्रकाश मेहता, पीयूष गोयल यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे मनोज कोटक यांनीही किरीट सोमय्य्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. परंतु भाजपाचे काही जुने नेते किरीट सोमय्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. किरीट सोमय्या यांना उमेदवारी न देण्यासाठी शिवसेना आक्रमक आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीसंदर्भात झालेल्या चर्चेत शिवसेनेने तीन अटी ठेवल्या होत्या. यापैकी एक म्हणजे किरीट सोमय्या यांची उमेदवारी रद्द करावी, अन्यथा आम्ही सोमय्या यांचा प्रचार करणार नाही, असं म्हटले होते. त्यामुळे अखेर भाजपानं मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. किरीट सोमय्यांना तिकीट देण्यात आल्यास त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं सुनील राऊत यांनी म्हटलं होतं. 'वेळ पडल्यास मी अपक्ष लढेन. पण मी सोमय्यांविरोधात 100 टक्के निवडणूक लढवणार,' असा निर्धार राऊत यांनी बोलून दाखवला होता. त्यामुळे युतीमधील गटबाजीचा फटका बसू नये, यासाठी किरीट सोमय्यांना डावलण्यात आलं आहे.