मुंबई : अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात मोंटाना इमारतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मनोज पटेल यांचा भाऊ परदेशातून भारतात परतला आहे. ओशिवरा पोलिसांनी मनोजचा मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला असून, तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मनोज व आशीष यांच्यात फारसे पटत नव्हते. आशीष अमेरिकेत त्याच्या कुटुंबासोबत राहतात. नातेवाईक नसल्यामुळे मनोजच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मनोजच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सोमनाथ पाल (२०), त्याची बहिण भारती (२५), आई शीखा (४५) आणि तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज (५५) या चौघांनी आत्महत्या केल्या होत्या. घरमालक टिंकुसिंग किशिनसंग (३५) याच्याकडून भारतीचे लंैगिक शोषण केले जात होते, त्याला कंटाळूनच या सर्वांनी आयुष्य संपवल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. भारतीचा कोणी मित्र अथवा प्रियकर होता का, याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. या चौकशीसाठी एक पथक नेमले आहे, असे एका वरिष्ठ तपास अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यासाठी लोखंडवाला आणि ओशिवरा परिसर पोलीस पिंजून काढत आहेत. (प्रतिनिधी)
मनोज पटेलचा भाऊ मुंबईत दाखल
By admin | Published: February 27, 2015 1:39 AM