पोर्ट्रेट स्पर्धेत मनोजकुमारची बाजी
By admin | Published: January 2, 2015 01:56 AM2015-01-02T01:56:21+5:302015-01-02T01:56:21+5:30
जे. जे. स्कूल आॅफ आर्टच्या आवारात रंगलेल्या दोन दिवसीय पोर्ट्रेट जत्रेत नव्या-जुन्या कलाकारांचा मेळा पार पडला
मुंबई : जे. जे. स्कूल आॅफ आर्टच्या आवारात रंगलेल्या दोन दिवसीय पोर्ट्रेट जत्रेत नव्या-जुन्या कलाकारांचा मेळा पार पडला. दुसऱ्या दिवशी पोर्ट्रेट चितारण्याच्या आॅनलाइन स्पर्धेतील निवडलेल्या १२ कलाकारांमधून मनोजकुमार सकळे या कलाकाराने प्रथम क्रमांक पटकावित बाजी मारली. तर प्रमोद कुवळेकर याने द्वितीय आणि नानासाहेब येवले याने तृतीय पारितोषिक पटकावले.
पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या जत्रेला उमद्या कलाकारांनी एकच गर्दी केली. आॅनलाइन स्पर्धेतील नऊ स्पर्धकांनाही प्रमाणपत्र आणि पारितोषिकांनी गौरवण्यात आले. या दोन दिवसीय पोर्ट्रेट जत्रेत वासुदेव कामत, सुहास बहुळकर आणि अनिल नाईक यांनी साकारलेल्या एकमेकांच्या चित्रांना सर्वांनीच दाद दिली. नव्या वर्षामध्येही पोर्ट्रेटची चळवळ सुरू राहणार असल्याचे आश्वासन या ग्रुपने देऊन अधिकाधिक उपक्रमांचा खजिना घेऊन भेटीस येणार असल्याचे सांगितले.
पोर्ट्रेटचे संपणारे सन्मानाचे स्थान पुन्हा मिळवून देण्याच्या मुख्य
उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एखाद्या साधकाप्रमाणेच अनेक वर्षांच्या एकाग्रतेनंतर कुंचल्यातून हुबेहूब पोर्ट्रेट साकारली जातात, त्यामुळे कलाकारानेही साधकाप्रमाणे त्याकरिता प्रयत्न करायला पाहिजेत, असे मत ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी व्यक्त केले.
(प्रतिनिधी)