मनोरुग्ण तरुणाने केली वाहनांची तोडफोड

By admin | Published: January 5, 2015 01:10 AM2015-01-05T01:10:53+5:302015-01-05T01:10:53+5:30

दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना रविवारी घणसोली येथे घडली. त्यामध्ये दोन बस व एका कारचे नुकसान झाले

Manorganver made the vehicles violate the vehicles | मनोरुग्ण तरुणाने केली वाहनांची तोडफोड

मनोरुग्ण तरुणाने केली वाहनांची तोडफोड

Next

नवी मुंबई : दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना रविवारी घणसोली येथे घडली. त्यामध्ये दोन बस व एका कारचे नुकसान झाले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र एका मनोरुग्ण तरुणाने केलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घणसोली सिम्पलेक्स येथे हा प्रकार घडला. ऐन सकाळच्या वेळी रस्त्यावरुन चाललेल्या वाहनांवर अचानक दगडफेक होवू लागली. एकामागून एक सलग तीन वाहनांवर हे दगड पडले. त्यामुळे बसच्या समोरील काचा फुटण्याचा आवाज होताच बसमधील प्रवाशांची आरडाओरडा करत बसमधून पळ काढला. या प्रकारात बेस्ट व एनएमएमटी अशा दोन बसचे तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारच्या काचा फुटल्या आहेत. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने अनेक जण सकाळीच बाहेर फिरायला जाण्यासाठी बसमध्ये चढले होते. त्याचवेळी बस थांब्यापासून काहीच अंतरावर हा प्रकार घडला. बसमधील प्रवासी व चालक यांना काही कळण्याच्या आतच हे सर्व घडले. याचवेळी एक तरुण हातामध्ये दगड घेवून रस्त्याने चाललेल्या वाहनांवर निशाना साधताना आढळून आला. संतप्त झालेल्या नागरिकांनी या तरुणाला पकडून रबाळे पोलिसांच्या ताब्यात दिले. दगडफेकीच्या या प्रकारामुळे घणसोली सिम्पलेक्स व घरोंदा परिसरात तणाव निर्माण होवून सुमारे ३०० नागरिकांचा जमाव तेथे जमला होता. परंतु दगडफेक करणारा हा तरुण रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. या तरुणाला सदर परिसरात यापूर्वी देखील फिरताना काहींनी पाहिलेले आहे. त्यामुळे सदर तरुणाच्या कुटुंबीयांची माहिती मिळवून त्याला कोपरखैरणे येथील नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याने केलेल्या दगडफेकीमध्ये १२१ क्रमांकाची एनएमएमटी (एमएच ४३ एच ५३६२) बस, बेस्टची ५२१ क्रमांकाची (एमएच ०१ एलए ६५६४) बस व कार (एमएच ४३ एएन १७९१) अशा तीन वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Manorganver made the vehicles violate the vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.