रक्तवीर भांडुपकर मोहीम; महिला विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन
सुहास शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आजच्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर त्यांच्या चार पावले पुढे जाऊन प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. मग कोरोना संकटात तरी त्या मागे कशा राहतील? सध्या राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी नारीशक्तीने पुढाकार घेतला असून, भांडुपमध्ये महिला विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भांडुपच्या साईविहार नाका परिसरात २ मे रोजी हे अनोखे रक्तदान शिबिर होणार असून, त्यात केवळ महिला रक्तदान करतील. देशात महिला रक्तदात्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक जणींना इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही. बऱ्याच जणींना रक्तदान करण्यासाठी घरातूनच पाठबळ मिळत नाही. अशा महिलांना रक्तदानासाठी तयार केल्यास राज्यातील रक्तटंचाई सहज दूर करता येईल, या उद्देशाने ‘रक्तवीर भांडुपकर’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांचा रक्तदानातील सहभाग वाढवायचा असल्यास हिमोग्लोबिनच्या समस्येवर मात करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘रक्तवीर भांडुपकर’च्या महिला पथकाने घरोघरी जाऊन जनजागृती करण्यावर भर दिला आहे. आहारात सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या, बीट, गाजर या पदार्थांचे प्रमाण वाढवा आणि रक्तदानासाठी मानसिकदृष्ट्या तयारी करा, असे आवाहन विभागातील महिलांना केले जात आहे. येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणानंतर ५० ते ५२ दिवस रक्तदान करता येत नाही. अशा वेळी राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू शकतो. ही बाब लक्षात घेऊन जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संस्थेच्या सदस्य शीतल भोवड यांनी सांगितले.
................
प्रसूतीवेदना सहन करणाऱ्यांना सुईची भीती कसली?
महिला प्रसूतीवेळी असंख्य वेदना सहन करून बाळाला जन्म देते. पण मृत्यूच्या दाढेतून परत आलेली स्त्री रक्तदानासाठी घाबरते, ही मनाला न पटण्यासाठी गोष्ट आहे. महिलांमध्ये जागृती केल्यास त्यांचा रक्तदानातील सहभाग वाढेल, ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्याचे ठरले. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पूर्णतः पालन करून, तसेच रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन हे शिबिर आयोजित केले जाणार असून, जास्तीत जास्त महिलांनी त्यात सहभाग घेऊन नारीशक्तीचा परिचय संपूर्ण जगाला करून द्यावा, असे आवाहन भांडुपमधील सामाजिक कार्यकर्त्या शीतल भोवड यांनी केले आहे.