Join us  

रेल्वे स्थानकांवर मनुष्यबळ ‘जैसे थे’

By admin | Published: January 05, 2016 2:43 AM

मेट्रो आणि मोनो स्थानकाप्रमाणेच पश्चिम, मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी जीआरपीकडून

मुंबई : मेट्रो आणि मोनो स्थानकाप्रमाणेच पश्चिम, मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी जीआरपीकडून (गर्व्हमेन्ट रेल्वे पोलिस) एक नविन प्रस्ताव बनवण्यात आला होता. महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे ५00 सुरक्षा रक्षक जीआरपीला मिळावेत असा प्रस्ताव बनवतानाच तो शासनाकडेही सादर केला गेला. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जीआरपीचे मनुष्यबळ जैसे थेच राहिले आहे. सध्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानक आणि हद्दीत होणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची तसेच प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही जीआरपीवर आहे. तर रेल्वेतील मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वे सुरक्षा दलावर (आरपीएफ)आहे. जीआरपीकडे सध्या ३,५00 मनुष्यबळ असून त्यांना हे मनुष्यबळ फारच कमी पडत आहे. त्यामुळे रेल्वे आणि हद्दीतील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवताना त्यांची चांगलीच तारांबळ उडते. त्यांच्या मदतीसाठी ५00 होमगार्डही मंजुर करण्यात आले आहेत. मात्र होमगार्ड हे ऐच्छिक काम करणारी संस्था आहे. त्यामुळे ५00 होमगार्ड मंजुर असूनही २५0 ते ३00 होमगार्डच स्थानकांवर जीआरपीच्या मदतीला येतात. तसेच या होमगार्डकडून फारशी मदतही जीआरपीला मिळत नाही. जीआरपीवरील ताण पाहता त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे ५00 सुरक्षा रक्षक मिळावेत, असा प्रस्ताव शासनाकडे सहा महिन्यांपूर्वीच पाठवण्यात आला आहे. सध्या सिक्युरिटी कॉर्पोरेशनची सुरक्षा ही मेट्रो आणि मोनो रेल्वेलाही पुरविली जात आहे. मेट्रो स्थानकांच्या सुरक्षेसाठी ७३0 तर मोनोच्या सुरक्षेसाठी ५५0 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. या सशस्त्र रक्षकांकडून आतापर्यंत मेट्रो आणि मोनोची उत्तम सुरक्षा सांभाळण्यात आली आहे.या प्रस्तावावर शासनाकडून अद्यापही विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे जीआरपीवर कामाचा ताणही पडत आहे. याबाबत जीआरपी आयुक्त मधुकर पाण्डे यांना विचारले असता, हा प्रस्ताव मंजुर झालेला नसून त्याचा पाठपुरावा केला जात आहे. शासनाच्या हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)