कुलाब्यात मनसैनिकांची धाव, अखेर सराफ दुकानदाराने 'मराठीतून' मागितली आजीबाईंची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 11:20 AM2020-10-09T11:20:50+5:302020-10-09T12:30:34+5:30
मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी कुलाबा गाठल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत शोभा देशपाडे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच, सराफ दुकानाच्या मालकास बोलावून माफी मागण्यास भाग पाडले.
मुंबई - मराठी बोलण्यास नका देत 75 वर्षीय महिलेला दुकानाबाहेर काढणाऱ्या सराफ दुकानदाराने अखेर माफी मागून आंदोलन मागे घेण्याची विनंती शोभा देशपांडे यांना केली. मराठीचा आग्रह धरत आंदोलन केलेल्या शोभा देशपांडे यांचे वृत्त मीडिया आणि सोशल मीडियात झळकताच, मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही कुलाब्यातील ते दुकना गाठून महिलेच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी कुलाबा गाठल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत शोभा देशपाडे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच, सराफ दुकानाच्या मालकास बोलावून माफी मागण्यास भाग पाडले. मराठीजनांचा आग्रहापुढे अखेर गुजराती सराफ दुकानदाराने मराठीतून माफी मागत आपली चूक कबुल केली. लेखिकेचे पाय धरून या सराफ दुकानदाराने माफी मागत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, शोभा देशपांडे यांनी दुकानाचा परवाना दाखविल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र, पोलिसांच्या विनंतीवरुन आणि मनसे व शिवसेना कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी 16 तासांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेतले. त्यानंतर, पोलिसांनी उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले आहे. मनसेकडून या दुकाना मालकाला मारहाणही करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्रात विशेषत: मुंबईतच अनेकदा माय मराठीचा अवमान झाल्याच्या घटना उघडकीस येतात. काही अमराठी भाषिकांकडून मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देत मराठी माणसांना, मराठीजनांना डिवचण्याचं काम होतंय. आज पुन्हा एकदा अशीच घटना मुंबईतील कुलाबा परिसरात उघडकीस आली होती. येथील महावीर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानदाराने शोभा देशपांडे यांना मराठी बोलण्यास नकार देऊन महिलेस अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई करून पोलिसांना बोलावून अपमानित केले. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळ ५ वाजल्यापासून त्यांनी दुकानासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले होते.
पोलिसांनी अपमानित केले म्हणून, जोपर्यंत मुंबई पोलीस आयुक्त स्वतः येत नाहीत, आणि दुकानदार परवाना दाखवत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत माहिती मिळताच, मराठी एकीकरण समिती संघटनेचे काही मराठी शिलेदार यांनीदेखील घटनास्थळी जाऊन उपस्थित राहून ही बाब समजून घेतली, पोलिसात तक्रार दाखल करू असे समजावले. परंतु त्यांचा पोलिसांवर विश्वास नाही आणि मी इथून हलणारच नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर, आज सकाळी मनसेचे संदीप देशपांडे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.
शोभा देशपांडे या लेखिका असून 'थरारक सत्य इतिहास' आणि 'इंग्रजी इंडिया हाच आपला खरा शत्रू' या दोन पुस्तकांचे संकलन त्यांनी केलंय. शोभाताई मराठी प्रेमी असून त्या मराठीचा नेहमीच आग्रह करत असतात, त्यातुनच सदर दुकानाच्या गुजराती मालकासोबत त्यांचे खटके उडाले, आणि मराठी माणसाचा अपमान केला गेला म्हणून आंदोलन करतेय असे त्यांचे म्हणणे आहे. ७५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या शोभा देशपांडे विना अन्न-पाण्याच्या आंदोलनाला बसल्या आहेत.