ठाणे : महापालिकेच्या कळवा तरणतलावात गेल्या कित्येक दिवसांपासून हिरवे पाणी येत असल्याने येथे प्रशिक्षणासाठी येणाऱ्यांना या तलावात मज्जाव केला जात आहे. याविषयी पालिकेकडे तक्रार करूनही यावर तोडगा निघत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर गुरुवारी या तलावात भांडी घासो हे अनोखे आंदोलन करून पालिकेला जाग आणण्याचा प्रयत्न केला. कळवा येथील महापालिकेचा हा तरणतलाव २५ वर्षे जुना असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून त्यातील पाणी हिरवे झाल्याने येथे पोहण्यासाठी येणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यासंदर्भात काही जलतरणपटूंनी पालिकेकडे तक्रारदेखील केली. परंतु, यावर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. यामुळे अखेर गुरुवारी मनसेने येथे भांडी घासो आंदोलन करून पालिकेला जाग आणण्याचा प्रयत्न केला. तसेच यासंदर्भात उपायुक्त मुख्यालय, संदीप माळवी यांना एक निवेदन दिले. त्यानुसार, या तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फिल्ट्रेशन प्लांटमध्ये बिघाड झाल्यानेच तलावात असे पाणी आल्याचे त्यांनी सांगितले. अखेर, आता काही दिवसांसाठी हा तरणतलाव दुरुस्तीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून दुरुस्तीच्या काळात कोणत्याही प्रकारचे नवीन अॅडमिशन घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
कळवा तरणतलावात मनसेचे भांडी घासो आंदोलन
By admin | Published: March 19, 2015 10:28 PM