Mansoon: येत्या २४ तासांत मान्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात दाखल; हवामान खात्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 09:32 PM2020-06-13T21:32:51+5:302020-06-13T21:36:49+5:30
छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि दक्षिण गुजरातसह दक्षिण मध्य प्रदेशात दाखल होईल. येत्या ४८ तासांत कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल.
मुंबई - मान्सून शनिवारी रात्री ९ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, मान्सून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथील उर्वरित भागात दाखल झाला. या व्यतीरिक्त छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारच्या काही भागात दाखल झाला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल आहे. येत्या २४ तासांत मान्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात दाखल होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि दक्षिण गुजरातसह दक्षिण मध्य प्रदेशात दाखल होईल. येत्या ४८ तासांत कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. विदर्भ येथ मुसळधार पाऊस कोसळेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस कोसळेल. पश्चिम किनारी ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील. मच्छिमारांनी समुद्रात उतरु नये असं आवाहन करत पुढील चार ते पाच दिवस राजस्थानात उष्णतेची लाट येईल असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
शनिवारी दुपारी मान्सुन हर्णे, अहमदनगर, औरंगाबाद, गोंदिया, चंपा आणि रांचीसह लगतच्या प्रदेशात दाखल झाला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठीचे हवामान अनुकूल असून, रविवारी मान्सून मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भागात व दक्षिण गुजरातमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. १३ जून रोजी मान्सून महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात दाखल झाला आहे. कोकणात हर्णे, मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, मराठवाड्यात औरंगाबाद, विदर्भात गोंदिया येथे दाखल झाला आहे. येत्या २४ तासांत संपुर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल. शनिवारी रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथे मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
येत्या चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे मुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती. दिवसभर शहर आणि उपनगरात ऊनं पडले होते. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे चित्र होते. रात्री आठ वाजता काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.