Sachin Vaze News: उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे यांच्याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सचिन वाझे यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस असल्याचा दावा वाझे यांच्या वकिलांनी केला आहे. वाझे यांचे वकील रौनक नाईक यांनी एनआयएच्या विशेष कोर्टाकडे वाझे यांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठीचा अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, एनआयए कोर्टानंही सचिन वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागवला आहे. Sachin Vaze have heart blockages.
एनआयएनं १३ मार्च रोजी वाझे यांना अटक केली आहे. शनिवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपत आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा वाझे यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. वाझे यांचे वकील रौनक नाईक यांनी कोर्टाला एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी सचिन वाझे यांना छातीत दुखण्याचा त्रास असून त्यांच्या हृदयात ९० टक्क्यांचे दोन ब्लॉकेजेस आहेत. त्यामुळे वाझे यांना कार्डियोलॉजिस्टकडून उपचार घेऊ दिले जावेत, अशी मागणी वाझेंच्या वकीलानं केली आहे.
पुन्हा ३० दिवसांची कोठडीची मागणीची शक्यताएनआयएनं सचिन वाझेंविरोधात UAPA च्या अंतर्गत देखील गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामुळे एनआयला वाझे यांच्या ३० दिवसांच्या कोठडीचा अधिकार प्राप्त होतो. याच पार्श्वभूमीवर वाझेंच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी एनआयएकडून केली जाण्याची शक्यता आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?मुंबईत २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक बेवारस स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. कारमधून २० जिलेटिनच्या कांड्या आणि एक पत्र जप्त करण्यात आलं होतं. संबंधित कारचे मालक मनसुख हिरेन असल्याचं २६ फेब्रुवारी रोजी उघडकीस आलं होतं. पण त्यांनी १७ फेब्रुवारी रोजीच कार चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. ६ मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयितरित्या रेतीबंदर परिसरात आढळला होता. सुरुवातीला हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. पण हिरेन यांच्या पत्नीनं मनसुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. त्यानंतर एनआयएच्या तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आणि १३ मार्च रोजी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणी वाझे यांचा हात असल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे.