एटीएसकडून कागदपत्रे घेतली ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील राजकारण व पोलीस वर्तुळात खळबळ उडवून दिलेल्या अँटलियाच्या स्फोटक कार प्रकणाबरोबरच ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत त्याचा तपास करणाऱ्या एटीएसकडून एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे व दस्तऐवज जप्त केला.
वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे हाच मनसुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचे तपासातून समोर आले. त्यामुळे त्याला एनआयएकडून ताब्यात घेण्यासाठी एटीएस प्रयत्नशील होती. मात्र, स्फाेटक कार प्रकरणाचा तपास हा हिरेन यांच्या हत्येशी असल्याचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. त्यामुळे हत्येचा गुन्ह्याचा तपास आपल्याकडे घेण्याबाबत केंद्रीय गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. तो मान्य करीत त्याबाबत राज्य सरकारला सूचना दिल्या. त्यानुसार शनिवारी तपास एटीएसकडून ताब्यात घेण्यात आला. ५ मार्चपासून एटीएस त्याचा तपास करीत होती.
------------------
हिरेन यांच्या वकिलांकडे चौकशी
या प्रकरणात हत्या झालेल्या ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांचे वकील के.एच. गिरवी यांची एनआयएच्या पथकाने शनिवारी सुमारे चार तास चौकशी केली. सचिन वाझेनेच पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाबाबत हिरेन यांना पत्र लिहून दिले होते, असे त्यांनी सांगितल्याचे समजते. वाझेला ६ महिन्यांपासून ओळखत असल्याची कबुली त्यांनी दिली.
---------------
अँटिलियाच्या परिसरात वाझेला सातवेळा चालवले
अँटिलियाच्या परिसरातील स्काॅर्पिओची इनोव्हातून उतरून पाहणी करणारा सचिन वाझे होता, याबद्दल एनआयएच्या अधिकाऱ्यांना खात्री पटली आहे. त्याबाबत शुक्रवारी रात्री घटनास्थळी त्याला सातवेळा चालविण्यात आले. पांढरा पायजमा आणि डोक्यावर रुमाल बांधून त्याला चालवून विविध कोनांतून त्याची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या व्यक्तीप्रमाणे त्याची चाल मिळतीजुळती असल्याचे सांगण्यात आले.