मनसुख हिरेन यांची हत्या व्होल्वो गाडीतच केल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:07 AM2021-03-24T04:07:17+5:302021-03-24T04:07:17+5:30
विनायक करायचा हफ्ता वसुली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दीव दमण येथून जप्त केलेली व्होल्वो ...
विनायक करायचा हफ्ता वसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दीव दमण येथून जप्त केलेली व्होल्वो कार ४ मार्च रोजी सचिन वाझेने काही कामानिमित्त ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. याच वाहनात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय एटीएसला आहे. त्या दिशेने अधिक तपास सुरू असल्याची माहिती एटीएस सूत्रांकडून मिळाली.
एटीएसने जप्त केलेली गाडी दमण येथील अभिषेक अग्रवाल यांची आहे. त्यांचा सायकल विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायात वाझेही भागीदार होता. वाझेने कामानिमित्त ४ मार्च रोजी ही गाडी स्वतःकडे घेतली होती, अशीही माहिती समोर येत आहे. अशात, ४ मार्च रोजी विनायक शिंदेने बनावट सिमकार्डद्वारे तावडे नावाने मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे, याच वाहनात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय एटीएसला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने याबाबत अधिक तपासणी सुरू आहे.
* पॅरोलवर बाहेर आल्यानंतर सुरू होती हफ्ता वसुली
२००७ मध्ये वर्सोवा येथे झालेल्या लख्खन भैया एन्काऊंटर प्रकरणात विनायक शिंदेला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याला या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे मे २०२० मध्ये तो पॅरोलवर बाहेर आला. त्यानंतर तो वाझेच्या बेकायदा कामात सहकार्य करत हाेता. तसेच पोलीस ओळखपत्राच्या आधारे तो मुंबईसह ठाण्यातील पब, हुक्का पार्लर, बार मालकाकडून हफ्ते वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. त्यानुसार पथक अधिक तपास करत आहे.
....