शिंदे, गौरवला ७ एप्रिलपर्यंत कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे आणि त्याच्या साथीदारांना बनावट मोबाइल सिम कार्ड पुरविणाऱ्या अहमदाबाद येथील दोघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआरआय) मंगळवारी ताब्यात घेतले. एटीएसच्या पथकाने त्यांना अटक करून मुंबईत आणले हाेते. मात्र मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग झाल्याने त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी अटक केलेल्या विनायक शिंदे व क्रिकेट बुकी नरेश गौरवला ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली.
हिरेन हत्येप्रकरणी वाझेसह या दोघांनी गुन्ह्याच्या कालावधीत अनेक सिमकार्डचा वापर केला होता. त्यांनी ती अहमदाबादमधून मागवली होती. एटीएसच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन कार्ड पुरविलेल्या किशोर ठक्कर याला व त्याच्या एका नातेवाइकाला ताब्यात घेतले. ट्राझिस्ट रिमांडवर त्यांना घेऊन पथक मंगळवारी मुंबईत परतले. त्यानंतर त्यांना एनआयएच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले. बुधवारी त्यांना एनआयए कोर्टात हजर केले जाईल.
* वाझेची जे.जे.मध्ये तपासणी
सचिन वाझेच्या छातीत दुखू लागल्याने त्याला रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. त्याची चाचणी करण्यात आली. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास त्याला परत नेण्यात आले. यापूर्वीही चौकशीदरम्यान दोन-तीन वेळा सचिन वाझेची प्रकृती बिघडली होती, तेव्हाही एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले होते.
* शिंदे व गौरववरही ‘यूएपीए’अंतर्गत कारवाई!
अटकेतील विनायक शिंदे आणि नरेश गौरवरही ‘यूएपीए’ कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. स्फोटक कार आणि मनसुख हिरेन प्रकरणातील त्याचा मुख्य साथीदार सचिन वाझेविरोधात या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांवरही ही कलमे लावली जातील. त्यांना किमान एक महिना जामीन मिळू शकणार नाही.