Join us

मनसुखच्या हत्येचा कट वाझेच्या ऑडी कारमध्ये ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:06 AM

शिंदेसमवेत प्लॅन रचल्याचा संशय; एनआयएकडून वसईत शोधमोहीमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्फोटक कारच्या गुन्ह्यात मनसुख हिरेन यांनी अटक ...

शिंदेसमवेत प्लॅन रचल्याचा संशय; एनआयएकडून वसईत शोधमोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्फोटक कारच्या गुन्ह्यात मनसुख हिरेन यांनी अटक होण्यास नकार दिल्याने आणि आपले बिंग फुटू नये यासाठी त्यांच्या हत्येचा कट सचिन वाझेने विनायक शिंदेसमवेत रचला होता. त्याच्या ऑडी कारमधून एकत्र प्रवास करीत त्यांनी त्याबाबतचा प्लॅन केला होता, अशी माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली.

वाझे व शिंदे ऑडीतून प्रवास करीत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज वरळी सी-लिंकच्या टोल नाक्यावर सापडले आहेत. ही ऑडी वसई, विरार या ठिकाणी ठेवण्यात आल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे, त्यामुळे तपास पथकाने गुरुवारी त्या भागात जाऊन शोधमोहीम राबविली.

महागड्या कारचा शौकीन असलेल्या वाझेकडे विविध कारचा ताफा होता. त्यापैकी अनेक इतरांच्या नावावर असून तो त्याचा वापर सोयीनुसार करत होता. एनआयएने मर्सिडीज, इनोव्हा, स्काॅर्पिओ, आउट लँडर अशा एकूण सात गाड्या जप्त केल्या आहेत. त्याशिवाय निळ्या रंगाची ऑडीही त्याच्याकडे होती. बहुतांशवेळा ती ‘सीआययू’मधील त्याचा तत्कालीन सहकारी सहाय्यक निरीक्षक प्रशांत ओव्हाळ आणि अटकेत असलेला विनायक शिंदे यांच्याकडे असायची, अशी माहिती समोर आली आहे.

वरळी सी-लिंक येथील टोल नाक्यावरील २ मार्चच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही ऑडी (एमएच ०४ एफझेड ६५६१) आढळून आली आहे. शिंदे ती चालवित होता, तर वाझे त्याच्या बाजूला बसला होता. टोल देण्यावरून शिंदेची कर्मचाऱ्यांशी वादावादी झाल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. यावेळी दोघांनी हिरेन यांच्या हत्येचा कट रचल्याची शक्यता अधिकाऱ्यांना आहे. शिंदेने ही गाडी वसई-विरार भागात नेऊन ठेवल्याची माहिती मिळाल्याने त्याठिकाणी शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

* ‘कल्चर हाउस’मध्ये झाडाझडती

एनआयएच्या पथकाने गुरुवारी सकाळी गिरगाव येथील बाबुलनाथ मंदिराजवळील कल्चर हाउस या हॉटेलवर छापा टाकला. तेथील मॅनेजर देबी सेनला ताब्यात घेतले. सोनी बिल्डिंगमधील या हॉटेलमध्ये आरोपीची बैठक झाली होती, त्यामुळे तेथील व्यवस्थापकाकडे विचारणा करण्यात येत आहे. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले. तपासणीवेळी १००वर गिऱ्हाईक होते, त्यांना बाहेर काढून झडती घेण्यात आली.