संगीतातून मिळणार मन:शांती
By admin | Published: March 14, 2016 02:06 AM2016-03-14T02:06:39+5:302016-03-14T02:06:39+5:30
धकाधकीचे आयुष्य, डेडलाइनचा ताण, दीर्घ आजारामुळे आलेले नैराश्य अशा अनेक कारणांमुळे काही व्यक्ती त्रस्त असतात
मुंबई : धकाधकीचे आयुष्य, डेडलाइनचा ताण, दीर्घ आजारामुळे आलेले नैराश्य अशा अनेक कारणांमुळे काही व्यक्ती त्रस्त असतात. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मार्ग मिळत नाही. अशा रुग्ण आणि तणावग्रस्तांना संगीताच्या माध्यमातून मन:शांती मिळवून देण्यासाठी १८ मार्च रोजी कुमार चॅटर्जी यांनी ‘आनंदघन धन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
‘आनंदघन धन’ याचा अर्थ संगीताच्या माध्यमातून आनंदाचा शोध घेणे. हा कार्यक्रम दृक-श्राव्य माध्यमातून सादर केला जाणार आहे. अध्यात्म योगी आनंदघन यांच्या पद, स्तवनांना दृकश्राव्य माध्यमातून सादर केले जाणार आहे. या पदांचे, स्तवनांचे गायन केल्यामुळे आयुष्यातील तणाव दूर होण्यास नक्कीच मदत होईल. विविध रागांतील स्तवन, पदे या दृकश्राव्याच्या माध्यमातून सादर केली जाणार असल्याची माहिती कुमार चॅटर्जी यांनी दिली.
संत आनंदघन हे १७व्या शतकात राजस्थानातील मेडटा गावात राहत होते. आनंदघन यांनी अनेक स्तवने लिहिली आहेत. यातील ‘आनंदघन चोवीसी’ हे खूप प्रसिद्ध आहे. पण, अनेकांना त्यांची स्तवन, पँदे माहीत नाहीत.
१८ मार्चला वरळीच्या नेहरू सेंटरच्या आॅडिटोरिअममध्ये सायंकाळी ७ ते रात्री १०पर्यंत हा कार्यक्रम होईल. सुमारे १५० व्यक्ती उपस्थित राहतील. स्तवने उपस्थितांकडून गाऊन घेतली जाणार आहेत. (प्रतिनिधी)‘संगीत आणि
मंत्रा’चे अभ्यासक
कुमार चॅटर्जी हे ‘संगीत आणि मंत्र’ या विषयाचे अभ्यासक आहेत. विविध रागांतील मंत्र सादर केल्यावर शरीरातील कोणत्या अवयवावर काय परिणाम होतो. शरीर क्रियेवर काय परिणाम होतो. हार्मोन्समध्ये होणारे बदल, केमिकल रिअॅक्शन याचा सखोल अभ्यास चॅटर्जी यांनी केला आहे. अल्झायमर, पार्किनसन्स, कर्करोगाच्या रुग्णांना आणि तणावग्रस्त व्यक्तींना संगीताच्या माध्यमातून मन:शांती मिळवून देणे यात चॅटर्जी यांनी प्रावीण्य मिळवले आहे.