लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: आम्ही दत्तक घेतलेल्या २०० घरातून मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रावर घेऊन जाऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आम्ही सगळ्यानी कंबर कसली असल्याची शपथ मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात झालेल्या निवडणूक प्रशिक्षण शिबिरात अंगणवाडी सेविका, क्षेत्रीय अधिकारी , अशा सेविका, आरोग्य अधिकारी यांनी घेतली. शिबीरामध्ये भावनिक साद घालत प्रशिक्षणासाठी उपस्थित मतदार दूतांना राष्ट्रीय जबाबदारी पार पाडण्याचा मूलमंत्र डॉ. सुभाष दळवी यांनी दिला मूलमंत्र मुंबई उपनगर जिल्हा स्वीप चे नोडल अधिकारी डॉ.सुभाष दळवी यांनी दिला. हे शिबीर गुरुवारी कुर्ला येथील बंटारा सभागृहात पार पडले.मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाचा स्तर वाढविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. लोकशाहीचा रथ विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर सर्वांनी या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात जावून मतदारांना मार्गदर्शन करायला हवे आणि मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करायला हवे अशी गरज दळवी यांनी व्यक्त केली. मतदारांच्या अडचणी समस्या असतील तर त्या भागात नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून सोडविल्यास मतदानाचा टक्का कसा वाढेल याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका, आरोग्य व आशा सेविका, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानातील संस्था व त्यांचे सफाई मित्र याचे खुप मोठे नेटवर्क आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या कार्यक्षेत्रात जावून तसेच व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.या प्रशिक्षण कार्यक्रमात ४० क्षेत्रीय अधिकारी, ३०० केंद्रस्तरीय अधिकारी, ६०० अंगणवाडी सेविका, ३०० आरोग्य तसेच आशा कर्मचारी, व इतर ४० कर्मचारी असे एकुण १२८० मतदार दूत उपस्थित होते.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार दूतांना मूलमंत्र
By सीमा महांगडे | Published: April 18, 2024 10:51 PM