मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये बांधकामांचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे या बांधकामातून तयार होणारा दगड, माती म्हणजेच डेब्रिजच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे पालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. हा कचरा डम्पिंग ग्राऊंडवरच टाकला जात असल्याने देवनारचा भार वाढला आहे़ त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका लवकरच नियमावली तयार करणार आहे़मुंबईतून दररोज नऊ हजार मेट्रिक टन कचरा जमा होत असतो़ यामध्ये डेब्रिजचे प्रमाण अडीच हजार मेट्रिक टन आहे़ डेब्रिजही डम्पिंग ग्राऊंडवरच टाकण्यात येत असल्याने देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे डोंगर वाढत चालले आहे़ त्यातच डम्पिंग ग्राऊंडवर सतत आग लागण्याची घटना घडत असल्याने कचराप्रश्न पेटला आहे़ यावर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेच आज मुंबई महापालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागविले़यावेळीस बांधकामातून निर्माण होणारा धूळ आणि कचरा याविषयी नियम तयार करण्याचा निर्णय झाला़ डेब्रिजची विल्हेवाट योग्यप्रकारे लावली जाईल, याची खबरदारी घेण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाने पालिकेला दिले़ त्यानुसार डेब्रिजची विल्हेवाट लावण्याबाबत १५ दिवसांमध्ये नियम तयार करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
बांधकाम कचऱ्यासाठी नियमावली
By admin | Published: March 31, 2016 2:31 AM