मुंबई : दहिसर पूर्व परिसरातील ठाकूर रामनारायण कॉलेज आॅफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्स या महाविद्यालयातील उपाहारगृहात तयार होणाºया ओल्या कचºयापासून जैविक खत निर्मिती करणारी टंब्लर पद्धतीची दोन यंत्रे नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहेत.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जाणीव-जागृती व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयातील उपाहारगृहामध्ये तयार होणाºया ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पात प्रत्येकी ९० किलो यानुसार एकूण १८० किलो एवढी क्षमता असणारे दोन टंब्लर (वैशिष्ट्यपूर्ण प्रकारचे पिंप) बसविण्यात आले आहेत. यामध्ये दररोज कचरा टाकण्यात येणार असून यामध्ये तयार होणारे खत हे साधारणपणे दर तीस दिवसांनी काढण्यात येणार आहे. या खताचा वापर महाविद्यालयाच्याच उद्यानांमध्ये आणि परिसरातील झाडांसाठी करण्यात येणार आहे.याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक तथा नगरसेवक सागर सिंह ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेच्या परिमंडळ ७ चे उपायुक्त विश्वास शंकरवार, महाविद्यालय व्यवस्थापन प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.