डायघरला पालिका करणार कच-यापासून वीजनिर्मिती
By admin | Published: September 12, 2014 01:35 AM2014-09-12T01:35:38+5:302014-09-12T01:35:38+5:30
सामूहिक भराव भूमी प्रकल्प बारगळल्याने आता ठाणे महापालिकेने शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलली आहेत
अजित मांडके, ठाणे
सामूहिक भराव भूमी प्रकल्प बारगळल्याने आता ठाणे महापालिकेने शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार, खासगी कंपनीच्या सहकार्याने डायघर येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) हा १३० कोटींचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यानुसार, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या कंपनीला महापालिका जागेसह कचरा विल्हेवाटीसाठी वार्षिक साडेआठ कोटींचा खर्च देणार आहे.
तळोजा येथे सामूहिक भरावभूमीचा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. परंतु, या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असल्याने आता ठाणे महापालिकेने पुन्हा आपला मोर्चा डायघरकडे वळवला आहे. महापालिका हद्दीत रोज सुमारे ६०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत आहे. कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका वार्षिक दीड कोटीचा खर्च करीत आहे. परंतु, आता या नव्या संकल्पनेनुसार महापालिका रेन्युझिन इनव्हायर्रो व्हेंचर्स, इंडिया प्रा. लि. या कंपनीला जागा देणार असून या जागेवर ही कंपनी पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प ४५ एकरच्या भूखंडावर उभारणार आहे.
विशेष म्हणजे या नव्या पद्धतीत भारतीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम न वापरता युरोपियन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम वापरले जाणार आहेत. ते भारतीय नियमांपेक्षा चारपट कठोर आहेत. याच नियमांचा आधार घेऊन हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामुळे प्रदूषण कमी होणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.