मुंबई : गणेशोत्सवामध्ये सुमारे १ हजार ८३ टन इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माल्य महापालिकेकडे जमा झाले आहे. हे सर्व निर्माल्य महापालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच आता या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. पुढील साधारपणे एका महिन्याच्या कालावधीत या सर्व निर्माल्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल. त्यानंतर तयार होणारे सर्व सेंद्रिय खत महापालिकेच्या उद्यानांमधील झाडांना खत म्हणून वापरण्यात येणार आहे.गणेशोत्सवादरम्यान मुंबई शहर व उपनगरांत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी २४६ निर्माल्य कलश पुरविण्यात आले होते. त्याचबरोबर हे निर्माल्य गोळा करून खतनिर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी १ हजार १०१ टेम्पोंची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जन स्थळे व लगतच्या परिसराची साफसफाई करण्यासाठी अशासकीय संस्थांकडून सरासरी ९०८ कामगारांची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जन स्थळी व लगतच्या परिसरात जमा होणारा कचरा वाहून नेण्यासाठी ३६४ अतिरिक्त वाहनांच्या सेवा (डम्पर्स) पुरविण्यात आल्या होत्या, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली. दरम्यान, गतवर्षीच्या गणेशोत्सवात सुमारे ६८५ टन निर्माल्य महापालिकेकडे जमा झाले होते. या वर्षी हे प्रमाण वाढून १ हजार ८३ मेट्रिक टनपर्यंत पोहोचले आहे.
हजार टन निर्माल्यापासून खतनिर्मिती
By admin | Published: September 17, 2016 4:03 AM