मुंबई : ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे नव्या इमारतींना बंधनकारक करण्यात आले असून, घर विकताना विकासकाने अशी अट रहिवाशांना घालणे सक्तीचे असणार आहे. विकास नियंत्रण नियमावली अशी तरतूद करण्याचा प्रस्तावच महापालिका सभेपुढे मांडण्यात आला आहे.मुंबईत दररोज नऊ हजार मेट्रिक टन कचरा तयार होत असून, काळाची गरज म्हणून नव्या इमारतींमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण व खतनिर्मिती प्रकल्प बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळावर उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये मनोरंजन मैदानासाठी जागा ठेवणे बंधनकारक आहे. तेथे कचरा खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या प्रकल्पात कचऱ्यावर जैव विघटन प्रक्रिया करणारे यंत्र बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र चटईक्षेत्र निर्देशांकातून वगळण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कचराभूमीवरील ताण कमी होणार आहे.विकासकांना इमारतींचा आराखडा तयार करताना त्यात हे प्रकल्प समाविष्ट करणे बंधनकारक असणार आहे. तसेच या घरांची व गाळ्यांची विक्री करताना हे प्रकल्प कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची सूचना ग्राहकांना करावी लागेल, अशी तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात येणार आहे. यासाठी महासभेत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
नव्या इमारतींना खतनिर्मिती बंधनकारक
By admin | Published: December 31, 2016 2:59 AM