तब्बल २२ हजार ४८३ कुटूंब राहत आहेत धोकादायक ठिकाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:06 AM2021-07-19T04:06:02+5:302021-07-19T04:06:02+5:30
मुंबई : दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्त हानी नवीन नसून, मागील १० वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना ...
मुंबई : दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्त हानी नवीन नसून, मागील १० वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही. मागील २९ वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत २९० लोकांचा मृत्यू झाला असून, ३००हून अधिक नागरिक जखमी झाले.
मुंबईतील ३६पैकी २५ मतदार संघात २५७ ठिकाणे डोंगराळ भागात धोकादायक म्हणून वर्गीकृत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याकडील माहितीनुसार, या भागातील २२ हजार ४८३ झोपड्यांपैकी ९ हजार ६५७ झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. पावसाळ्यात भूस्खलनामुळे ३२७ ठिकाणांबाबत सरकारला आधीच सतर्क करण्यात आले होते.
सन १९९२ ते २०२१ या दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २९० लोकांनी जीव गमावला असून, ३००हून अधिक जखमी झाले आहेत. २०१०मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणाऱ्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती आणि त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तर डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते. १ सप्टेंबर २०११ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. तथापि, त्यानंतर दहा वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, काहीच झाले नाही.