Join us

मुंबईत दिवसभरात आढळले तब्बल 8 हजार रुग्ण, आयुक्तांनी केलं महत्वाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 8:14 PM

मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांची माहिती दिली आहे. त्यानुसार, आज दिवसभरात 8063 रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देमुंबईत ३१ डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १६,४४१ इतकी होती, यात शनिवारी सहा हजाराची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ४५१ रुग्ण बरे झाले असून, एकूण ७ लाख ५० हजार १५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

मुंबई - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच, राजधानी मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला पहिल्या दोन दिवसांत ही रुग्णसंख्या जवळपास 15 हजारांवर पोहचली आहे. जानेवारीच्या 1 तारखेला दिवसभरात सहा हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर, दुसऱ्या दिवशी ही रुग्णसंख्या 8063 एवढी आढळून आली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर पुन्हा एकदा ‘कोरोनाची वाढती संख्या एक आव्हान बनत आहे. 

मुंबई शहर उपनगरात 1 जानेवारीला दिवसभरात ६,३४७ रुग्णांचे निदान झाले असून, १ मृत्यूची नोंद होती. त्यापैकी, ६,३४७ रुग्णांपैकी ५,७१२ रुग्ण लक्षणेविरहित आहेत, तर २२,३३४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती पालिकेने दिली होती. त्यानंतर, मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांची माहिती दिली आहे. त्यानुसार, आज दिवसभरात 8063 रुग्ण आढळून आले आहेत. आढळून आलेल्या रुग्णांपैकी 89 टक्के रुग्ण हे लक्षणविरहीत आहेत. तर, मुंबईतील एक्टीव्ह रुग्णांची संख्या 29,819 वर पोहचली आहे. आज बाधित झालेल्या 8063 रुग्णांपैकी 503 जणांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे, मुंबईतील 90 टक्के ऑक्सीजन बेड अद्यापही रिकामेच असल्याचं चहल यांनी सांगितलं. 

कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहून घाबरण्याचं कारण नाही. मात्र, सध्या गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी घरातच राहवे, कोविडसंदर्भात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही आयुक्त चहल यांनी मुंबईकरांना केलं आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोविड नियमावलींचे पालन आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. मास्क परिधान करणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायलाच हवे. आपण सर्वांनी एकजुटीने कोविड विरुद्धची लढाई लढायची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुंबईत ३१ डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १६,४४१ इतकी होती, यात शनिवारी सहा हजाराची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ४५१ रुग्ण बरे झाले असून, एकूण ७ लाख ५० हजार १५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ २५१ दिवसावर आला आहे. २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२८ टक्के आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईकोरोनाची लस