विधान परिषदेच्या ४ जागांसाठी शिवसेनेत अनेक इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:57 PM2020-06-10T18:57:18+5:302020-06-10T18:58:24+5:30
विधान परिषदेतील रिक्त झालेल्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या जागी शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टीच्या वाटेला प्रत्येकी चार जागा येणार आहेत.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : विधान परिषदेतील रिक्त झालेल्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या जागी शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टीच्या वाटेला प्रत्येकी चार जागा येणार आहेत. शिवसेनेतून कोणाला विधानपरिषदेची उमेदवारी द्यायची याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. मात्र शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या 4 जागांसाठी मुंबई, पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भ या विविध भागांमधून अनेक इच्छुक आहेत. शिवसेनेतील अनेक महिला सुद्धा विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक असून चार पैकी किमान दोन जागांवर महिलांची वर्णी लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईतून श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष व शिवसेना सचिव आदेश बांदेकर ( राज्यमंत्री दर्जा ), दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, मुंबई हॉस्पिटल मधील भारतीय कामगार सेनेचे नेते व श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे विश्वस्त संजय सावंत यांची नावे चर्चेत आहेत. 2017 रोजी झालेल्या विधान परिषदेच्या नावांसाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि विद्यमान विधान परिषद आमदार अँड. मनीषा कायंदे व मुंबईच्या माजी महापौर डॉ.शुभा राऊळ यांच्या नावांची चर्चा होती.मात्र मातोश्रीने अँड. मनीषा कायंदे यांच्या नावाची घोषणा केली होती.त्यामुळे यावेळी डॉ.शुभा राऊळ यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईच्या महापौर म्हणून त्यांनी केलेली चांगली कामगिरी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
दक्षिण मुंबईत शिवसेनेचा अनेक वर्षे आमदार नाही.त्यामुळे अनेक वर्षे दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विभागप्रमुखपद चांगल्या प्रकारे सांभाळणाऱ्या पांडुरंग सकपाळ यांच्या नावाचा यंदा विचार होऊ शकतो, तर खासदार विनायक राऊत यांनी 1999 ते 2004 पर्यंत विलेपार्ल्याचे आमदार म्हणून शिवसेनेचे नेतृत्व केले. मात्र त्यांच्या नंतर विलेपार्ल्याला शिवसेनेचा आमदार मिळाला नाही,त्यामुळे सांताक्रूझ व विलेपार्ल्यात शिवसेनेचे नेतृत्व म्हणून संजय सावंत यांच्या नावाचा विचार होऊ शकतो,तर आदेश बांदेकर यांनी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत चांगली कामगिरी केली आहे.त्यामुळे आदेश बांदेकर यांच्या नावाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता जरी आगामी विधान परिषदेवर जाण्यासाठी शिवसेनेत जरी अनेक इच्छुक असले तरी, अंतिम निर्णय हे उद्धव ठाकरे घेतात असे शिवसेनेच्या सूत्रांनी शेवटी स्पष्ट केले.