मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्तेच्या जोरावर भाजपा ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप पवारांनी भाजपा सरकारवर केला आहे. तसेच संसदीय लोकशाहीसाठी अशा प्रकारची वृत्ती घातक असल्याचंही ते म्हणाले आहेत. त्यानंतर भाजपा नेते गिरीश महाजन यांनीही पवारांवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेतून टीका केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, त्याचं खापर भाजपावर फोडलं जात आहे.त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.भाजपाकडून लोकांची दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या अनेकांची नावं पसरविली जात आहेत. लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम भाजपानं केलंय दुसरा पक्ष फोडून आपला पक्ष वाढविणे ही संस्कृती नव्यानं भाजपाने आणली आहे, तिला जनता स्वीकारणार नसून योग्य वेळी धडा शिकवेल. भाजपाकडून वावड्या उठवण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या जनतेला भाजपाचा हा नेते बदलाचा पोरखेळ पसंत नाही. भाजपाचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते फक्त योग्य वेळ आणि संधीची वाटत पाहत आहेत. काय चालू आहे या भाजपामध्ये, कुठे नेऊन ठेवलाय हा भाजपा, अशी टीकाही जयंत पाटलांनी केली होती. तसेच राजेश टोपे राष्ट्रवादीतच राहणार आहेत. त्यांच्याबाबत चुकीच्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या, असा खुलासाही त्यांनी केला आहे.
तत्पूर्वी पवार म्हणाले होते, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात असल्यानं ते पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. मोठ्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली भाजपा त्यांना आपल्या पक्षात घेऊन निवडणूक लढवण्यासाठी दबाव टाकत आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपात येण्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांनी नकार देताच प्राप्तिकर विभागामार्फत त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. सत्ताधारी भाजपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा गैरवापर करत आहे.
. चित्रा वाघ यांचे पती चौकशीच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे चित्रा वाघ घाबरल्या आहेत. चित्रा वाघ मला भेटल्या असून, पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आम्ही त्यांना काहीही मदत करू शकत नसल्याचंही पवारांनी सांगितलं आहे.