विधानसभेसाठी उत्तर पश्चिममधून काँग्रेसचे अनेक तर वर्सोव्यातून १४ इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 01:45 AM2019-07-15T01:45:56+5:302019-07-15T01:47:57+5:30
आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उत्तर पश्चिममधून काँग्रेसचे अनेक इच्छुक असून वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त १४ इच्छुक आहेत.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उत्तर पश्चिममधून काँग्रेसचे अनेक इच्छुक असून वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त १४ इच्छुक आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांचा दारुण पराभव केला. मात्र येत्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला काँग्रेसने सुरुवात केली आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसचे अनेक पदाधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. उमेदवारीच्या रिंगणात आम्हीसुद्धा आहोत, असे अर्ज त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयात अलीकडेच भरून दिले आहेत. या इच्छुकांची यादी ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.
वर्सोव्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व राष्ट्रीय सचिव नरेंद्र वर्मा व दिंडोशीतून माजी नगरसेवक अजित रावराणे इच्छुक असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने २ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्याव्यात, अशी मागणी गेल्या मे महिन्यात केली होती. गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून वर्सोव्याच्या स्थानिक असलेल्या व मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे व जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेविका सुगंधा शेट्ये यांची नावे चर्चेत आहेत.
१५८ जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पदाधिकारी ताज मोहम्मद शेख, भरतकुमार सोळंकी, पुष्पा भोळे, १५९ दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर दुबे, राजेंद्र प्रताप पांडे, संतोष सिंग, वीरेंद्र सिंग, संदीप सिंग, राकेश यादव, प्रेमभाई गाला, १६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र सिंग, किरण पटेल, माधवी राणे, प्रवीण नायक व सूर्यकांत मिश्रा हे इच्छुक आहेत. तर १६४ वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून चक्क १४ काँग्रेसचे पदाधिकारी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यामध्ये माजी आमदार बलदेव खोसा, महेश मलिक, डॉ. सिद्धार्थ खोसा, रईस लष्करीया, चंगेज मुलतानी, मोहसिन हैदर, किरण कपूर, भावना जैन, अखिलेश यादव, इष्टीक जांगीरदार, झिशन सिद्दिकी, जावेद श्रॉफ, परमजीत गब्बर, अब्दुल खान यांचा समावेश आहे. तर १६५, अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अशोक जाधव, मोहसिन हैदर व भरत कुमार सोळंकी, १६६ अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून संदीप वाल्मीकी या एकमेव इच्छुकाने अर्ज सादर केला आहे. मात्र माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी व माजी उपमहापौर राजेश शर्मा यांची नावे या इच्छुकांच्या यादीत नसल्याने चर्चा रंगली आहे.