मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का दिला आहे. गेल्या काही महिन्यात ठाकरेंकडील अनेक नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत सहभागी झाले. आता पुन्हा मुंबईतील उद्धव ठाकरे गटातील माजी आमदार, नगरसेवक तसेच काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मुंबईतील अणुशक्ती_नगर विभागातील उबाठा गटाचे माजी आमदार तुकाराम काते, वार्ड क्रमांक १४६ च्या माजी नगरसेविका व विधानसभा संघटक सौ. समृद्धी काते यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यासोबतच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि सिद्धीविनायक ट्रस्टचे माजी विश्वस्त भास्कर शेट्टी, माजी नगरसेविका सौ.पुष्पा कोळी, माजी नगरसेविका सौ.गंगा माने, माजी नगरसेवक वाजीद कुरेशी, माजी नगरसेवक बब्बु खान आणि माजी नगरसेवक कुणाल माने यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईचे सुशोभीकरण, रस्ते, फुटपाथ, उड्डाणपुलाखालील स्वच्छता आणि सौंदर्यीकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशी अनेक विकासकामे गेल्या वर्षभरात मुंबईत सुरू करण्यात आली आहेत. तसेच येणाऱ्या काही वर्षात सर्व मुंबईकरांचा प्रवास अधिक चांगला आणि सुरक्षित होणार आहे. आगामी दोन वर्षांमध्ये संपूर्ण मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मुंबई हे आतंरराष्ट्रीय शहर आहे. मुंबईची ओळख लवकरच ड्रग्स मुक्त करण्यासाठी सगळीकडे आता कडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. धारावीचा पुनर्विकास हाती घेण्यात येणार आहे. तसेच शहरातील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पुढील अडीच वर्षात खड्डेमुक्त मुंबई
शहरातील रस्त्यांचे क्रॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असते तर लोकांना अपघातात जीव गमवावा लागला नसता. पुढील दोन ते अडीच वर्षात मुंबईतील सर्व रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण केले जाईल. त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करत उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला.