शिवभोजन थाळीपासून अनेक जण वंचित; पालिकेच्या तीन रुग्णालयांत उपक्रम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 02:54 AM2020-01-28T02:54:54+5:302020-01-28T02:55:03+5:30
या योजनेअंतर्गत दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे.
मुंबई : पालिकेच्या केईएम, सायन व नायर रुग्णालयांत शिवभोजन थाळीला प्रजासत्ताक दिनी सुरुवात झाली. मात्र केवळ १०० थाळ्यांची मर्यादा असल्यामुळे अनेक जण यापासून वंचित राहिल्याचे दिसून आले. थाळीचा लाभ घेण्यासाठी काही जणांत शाब्दिक वाद झाल्याच्या घटनाही सोमवारी घडल्या.
या योजनेअंतर्गत दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. लाभार्थींच्या १० रुपयांच्या रकमेव्यतिरिक्तची उर्वरित रक्कम अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून अनुदान म्हणून केंद्रचालकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सोमवारी दुपारी सुरू होणाऱ्या या सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयांच्या उपाहारगृहांमध्ये लाभार्थींनी सकाळी ११ वाजल्यापासूनच रांगा लावल्या. मात्र रुग्णालय उपाहारगृहांचा आवारही छोटा असल्याने येथे गर्दी दिसून आली. प्रथम येणाºयास प्राधान्य या तत्त्वावर १०० थाळ्यांची मर्यादा असल्याने बºयाच जणांच्या पदरी निराशा आली. यामुळे नायर रुग्णालयात काही लोकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले. या सेवेसाठीच्या रांगेत भिकारी आणि रस्त्यावरची माणसेही असल्याने एकूणच गोंधळ उडाला.
वेळ वाढविण्याची मागणी
मर्यादित वेळेमुळे अनेक जण या सेवेपासून वंचित राहिले. बºयाच जणांना सेवा बंद झाल्यामुळे अधिकच्या पैशांत भोजन करावे लागले, याविषयी सामान्यांनी खंत व्यक्त केली. रांगेत उभे राहूनही निराशा आलेल्या लोकांनी थाळीसाठी तीन तासांची वेळ वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली, जेणेकरुन सर्वांना या सेवेचा लाभ मिळू शकेल.
शिवभोजन थाळीसाठी पहिल्या टप्प्यात १०० जणांची मर्यादा असल्यामुळे त्याहून अधिक लोक आल्यास लाभ मिळणार नाही. त्यामुळे प्रथम येणाºयास प्राधान्य या तत्त्वावर थाळीचा लाभ मिळू शकणार आहे. रुग्णालयातील लोकांची गर्दी पाहता सर्वांना सध्या लाभ मिळणे कठीण आहे.
- डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय
शिवभोजन थाळीचा आरंभ मुख्य तीन रुग्णालयांत झाला आहे, त्याला उत्तम प्रतिसाद आहे. १०० थाळींची मर्यादा असल्याने ती पाळावी लागेल. रोज १०० लाभार्थी हे धोरण आहे. लोक वाढल्यास त्यांना सेवा मिळणार नाही.
- डॉ. रमेश भारमल, पालिका वैद्यकीय रुग्णालय संचालक, नायर रुग्णालय अधिष्ठाता