Join us  

गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक

By admin | Published: May 27, 2014 12:45 AM

गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई : गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या १७ जणांनी ही तक्रार केली असून त्यांची १ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सॉफ्टेक कंपनीच्या माध्यमातून फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. या कंपनीचे मालक थॉमस रेड्डी (४८) यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली आहे. सीबीडीतील गौरी कॉम्प्लेक्स येथे रेड्डी यांचे सदर कंपनीचे कार्यालय होते. आपल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास प्रति महिना अडीच टक्के व्याज देऊ असे थॉमस यांनी गुंतवणूकदारांना सांगितले होते. त्यानुसार खारघर येथे राहणार्‍या मुग्धा पाटील यांच्यासह अनेकांनी आर्थिक गुंतवणूक केली होती. आॅगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१३ दरम्यान त्यांनी ही गुंतवणूक केलेली. परंतु ठरावीक कालावधीनंतर गुंतवणूकदारांना मोबदला देण्याची वेळ आल्यानंतर रेड्डी यांनी तो देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्येच थॉमस रेड्डी यांनी आपल्या कंपनीचे कार्यालय बंद करून पळ काढला. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाली आहे. मात्र रेड्डी यांच्या पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या गुंतवणूकदारांनी रविवारी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यामध्ये फसवणूक झालेले १७ गुंतवणूकदार समोर आले आहेत. त्यांची एकूण १ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. आर. पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी रेड्डी यांचा शोध सुरु असून या प्रकारात इतरही अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.