अवैध बांधकामांना कोरोनाचे बळ; लॉकडाऊन काळात पेव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 02:16 AM2020-06-20T02:16:03+5:302020-06-20T02:16:55+5:30

अतिक्रमणाचे महापालिकेपुढे आव्हान

many illegal constructions completed in the time of corona crisis | अवैध बांधकामांना कोरोनाचे बळ; लॉकडाऊन काळात पेव

अवैध बांधकामांना कोरोनाचे बळ; लॉकडाऊन काळात पेव

Next

मुंबई : कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत गेले चार महिने महापालिका यंत्रणा व्यस्त आहे. याचे गंभीर परिणाम अन्य महत्त्वाच्या नागरी सुविधा आणि कामांवर होताना दिसत आहेत. पावसाळापूर्व कामांप्रमाणेच मुंबईतील बेकायदा बांधकामांवरील कारवाई ही या काळात थंडावली आहे. यामुळे अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. मोकळ्या जागांवर होणारे अतिक्रमण मुंबईपुढे नेहमीच मोठे आव्हान ठरले आहे. अनधिकृत बांधकामांमुळे जीवितहानीचा धोकाही वाढत असल्याचे गेल्या काही दुर्घटनांवरून दिसून आले आहे. अतिक्रमणधारकांना ‘मुंबई प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६’ अन्वये नोटीसही दिली जाते.

मात्र, या कारवाईनंतरही त्याच जागी पुन्हा-पुन्हा अनधिकृत बांधकामे होत असल्याचे निदर्शनास येते. याची गंभीर दखल घेत गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपी अंतर्गत थेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतला. मात्र २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका व त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू असलेली मोहीम थंडावली. कुर्ला साकीनाका, पवई या परिसरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण नेहमीच सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे.

गेल्या काही दिवसांत या विभागात १५ अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. घाटकोपर, अंधेरी अशा काही विभागांमध्ये रात्रीच्या वेळेत बेकायदा बांधकामांना सुरुवात होते. शनिवार, रविवार दोन दिवस विभाग कार्यालये बंद असल्याने शुक्रवारी बांधकामाला सुरुवात होते. मात्र या वेळेस विभाग कार्यालयातील सर्व कर्मचारी कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात सहभागी असल्याने अनधिकृत बांधकामांवर कारवाईस काही विभागात विलंब होत असल्याचे दिसत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

थेट जेलची हवा
डोंगरी येथील इमारत दुर्घटनेतून मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा धोका गेल्या वर्षी पुन्हा समोर आला. मात्र पालिकेने नोटीस दिल्यानंतरही पुन्हा-पुन्हा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशांवर आता मुंबई प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अन्वये थेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे, असा निर्णय गेल्या वर्षी आॅगस्ट २०१९ मध्ये पालिकेने घेतला आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तीला थेट किमान तीन महिन्यांची कैद होऊ शकते.

कारवाई व्हायलाच हवी
कोरोना काळात महापालिकेची संपूर्ण यंत्रणा व्यस्त होती. या काळात मुंबईतील अनेक विभागांमध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. दोन-तीन मजल्यांच्या या अनधिकृत बांधकामांमुळे पावसाळ्यात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिकेने तत्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे.
- रवी राजा,
विरोधी पक्ष नेते, मुंबई महापालिका

Web Title: many illegal constructions completed in the time of corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.