"काही राजकारण्यांकडे ५-५ हजार एकर जमिनी, ना#डा फिरतो की काय त्याच्यावर अख्खा?"; राज ठाकरे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 08:54 AM2024-11-12T08:54:34+5:302024-11-12T08:56:47+5:30
Raj Thackeray : राजकीय नेत्यांकडे असलेल्या जमिनींचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंनी हल्ला चढवला.
Raj Thackeray News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे उतरले आहेत. राज्यभर राज ठाकरेंच्या सभा होत असून, राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते प्रचारातून जोर देताना दिसत आहेत. राज ठाकरे यांची सोमवारी दिंडोशी मतदारसंघात प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी नेत्यांकडे असलेल्या जमिनींचा मुद्दा मांडला.
राज ठाकरे म्हणाले, "आमच्याकडचे राजकारणी कशात गुंतले आहेत, जमिनी घेण्यात. काही काही राजकारण्यांच्या पाच-पाच, दहा-दहा हजार एक जमिनी आहेत. मला कळत नाही, काय नाग# फिरतो की काय त्याच्यावर अख्खा. का सकाळी उठल्यावर धावायला सुरूवात करतो नाग#. काय करणार एवढ्या जमिनीचं? किती हावरटपणा करावा?", असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
त्यांनी कामधंदा नको करायला? राज ठाकरे
"आपल्याकडे ते म्हणतात ना की, अरे याने इतके कमवले आहे की, सात पिढ्या नुसत्या बसून खातील. का बसून खातील. त्यांनी कामधंदा नको का करायला? कशाला बसून खातील? पण, हे जे मुलभूत प्रश्न आहेत, ज्याच्यासाठी आपण निवडणुका लढवतो. ज्याच्यासाठी तुम्ही रांगेत उभे राहता. त्यांना मतदान करता, त्या लोकांना या प्रश्नांचं भान नाही", असा घणाघात राज ठाकरेंनी केला.
"तुमच्या मुलभूत गरजांच्या पलिकडे कधी गेलाच नाहीत म्हणून भारतात शोध लागत नाहीत. जे जगामध्ये शोध लागतात, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे शोध लागतात, याचं कारण त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण झालेल्या असतात. म्हणून ते पुढे गेलेले असतात", असे राज ठाकरे म्हणाले.
"मिशा वाढवणारी आणि नखं वाढवलेली माणसं"
"आमच्याकडे गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जाणारी माणसं कोण? मिशा वाढवलेले आणि नखं वाढवलेले. त्याला अक्कल नाही लागत. लहानपणापासून कापले नाहीत की, ते वाढत जातात. तुझं काय कर्तृत्व? त्यामुळे आपल्याकडे कोणतेही शोध लागत नाहीत. मुलभूत गरजा संपल्यानंतर तरुण-तरुणींना काहीतरी वेगळं करण्याची स्वप्ने पडतील ना?", अशी टीका राज ठाकरेंनी केली.