मुंबई : लोकांमध्ये आजही घुबड पक्षी याविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे. ४ आॅगस्ट रोजी जागतिक घुबड जनजागृती दिवस म्हणून पाळला जातो, परंतु घुबड हा पक्षी शुभ की अशुभ या संभ्रमात लोक आहेत. त्यामुळे घुबड हे अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटले आहे. डॉ. प्रशांत वाघ यांनी शुभ-अशुभ या चक्रव्यूहात सापडलेल्या घुबड पक्ष्याविषयी लोकांमध्ये जनजागृतीसाठी घुबड पेंडंट संग्रहाचा छंद जोपासण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात विविध संग्रह छंदांमध्ये त्यांनी प्रदर्शन मांडून घुबडाविषयी असणारे गैरसमज दूर करून जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.डॉ. प्रशांत वाघ यांनी सांगितले की, घुबडांच्या डोक्यावर केसांचा गुच्छा असतो. तो कानासारखा दिसत असल्याने, त्याला भुतांची भाषा ऐकू येते, असा गैरसमज समाजात रूढ आहे. घुबडाची मान ही २७० अंशात फिरते. त्याची मान लवचिक असून, त्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे. त्यामुळे तो आपली मान शरीराभोवती गरागरा फिरवतो, परंतु यालाही काही लोक अशुभ मानतात. घुबडांप्रती प्रेम निर्माण झाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या घुबडाच्या विविध प्रकारच्या ज्वेलरी गोळा करण्याचा छंद जोपासला. आतापर्यंत ४४३ प्रकारांचे ज्वेलरी जमा केल्या आहेत. यात ३३४ गळ्यातली पदके, ३९ एअररिंग्स, ४९ कोटावरचे ब्रोच, २१ प्रकारच्या रिंग्स आणि चार अंगठ्यांचा समावेश आहेत.सोने-चांदी, गोल्ड प्लॅटिनम, विविध फॅन्सी आकाराचा घुबड पदकांमुळे ते बघणाऱ्यांच्या मनात या सुंदर प्रजातीविषयी कुतूहल निर्माण होते. सध्या हा पक्षी भारतात शुभ-अशुभ चक्रात अडकल्याने अंधश्रद्धेचा बळी पडत आहे. पर्यावरणाचा समतोल राखायचे असेल, तर घुबडांना वाचविण्याचे व त्यांच्याबद्दल जागरूकता तयार करणे गरजेचे आहे. येत्या वर्षात पाचशे घुबड पदकांचा संग्रह करण्याचा मानस आहे.
घुबडाविषयी आजही अनेक गैरसमज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 1:27 AM