वारकरी संप्रदायासहित अनेक संघटनांनी केला माजी राज्यपालांचा गौरव
By मनोहर कुंभेजकर | Published: February 15, 2023 03:49 PM2023-02-15T15:49:57+5:302023-02-15T15:51:18+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोश्यारी यांनी या वयातही शिवनेरी किल्ल्यावर पायी जाण्याचा जो आदर्श ठेवला होता, तो अविस्मरणीय आहे, असे उद्गार यावेळी उपस्थितांनी काढले.
मुंबई - वारकरी संप्रदायासह अनेक संघटनांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा गौरव केला. संविधानाच्या मर्यादेत राहून राजभवनाचे दरवाजे जनहितार्थ खुले करणाऱ्या कोश्यारीच्या सेवेचा माजी राज्यमंत्री अमरजित मिश्रा आणि भाजपा मुंबई सचिव सचिन शिंदे यांच्यासह वारकरी संप्रदायातील लोकांनी पंढरीच्या विठुरायाची मूर्ती भेट देत त्यांना निरोप व शुभेच्छा दिल्या. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात वारकरी संप्रदायासह मुंबई भाजपच्या उत्तराखंड सेलचे लोकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोश्यारी यांनी या वयातही शिवनेरी किल्ल्यावर पायी जाण्याचा जो आदर्श ठेवला होता, तो अविस्मरणीय आहे, असे उद्गार यावेळी उपस्थितांनी काढले. आदिवासींच्या समस्यांचा बारकाईने अभ्यास करता यावा यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी मोटारीने पालघरच्या आदिवासी भागात पोहोचण्याचे धाडस केले. तसेच नक्षलवाद्यांना घाबरण्याची गरज नाही, असा संदेश राज्यपाल म्हणून त्यांनी नक्षलग्रस्त भागात राहून जनतेला दिला असेही वक्त्यांनी यावेळी सांगितले.
अमरजित मिश्रा यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या संवेदनशीलतेवर आणि साध्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. तर सचिन शिंदे म्हणाले की, कोश्यारी यांनी लोकशाहीत राज्यपालांना जनतेच्या भावना जपण्याचे पुरेसे अधिकार असतात हे सिद्ध केले आणि त्या भावना त्यांनी वेळोवेळी जपल्या. एक राज्यपाल म्हणून त्यांनी या राज्यावर आपली वेगळी छाप उमटवली.
वारकरी संप्रदायाचे प.पू. कृष्णा गणपत घाडगे, ह.भ.प. शंकर विठोबा चिकणे आणि ह.भ.प. विठोबा रायबा घाडगे यांनीही कोश्यारी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशाल वसंत तोडणकर आणि उत्तराखंड सेल भाजपचे अध्यक्ष महेंद्रसिंग गोसाई, महामंत्री राजेंद्र शर्मा, सुषमा गैरोला, यशोदा रावत आदींनीही कोश्यारी यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.