Join us

अनेक पदपथ गायब

By admin | Published: October 28, 2015 12:08 AM

मोनो रेल्वे प्रकल्पामुळे चेंबूरच्या आर.सी. मार्गावरील फूटपाथची गेल्या काही वर्षांत दुरवस्था झाली होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी येथील सर्व फूटपाथ नव्याने तयार करण्यात आले.

मुंबई : मोनो रेल्वे प्रकल्पामुळे चेंबूरच्या आर.सी. मार्गावरील फूटपाथची गेल्या काही वर्षांत दुरवस्था झाली होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी येथील सर्व फूटपाथ नव्याने तयार करण्यात आले. मात्र, यातील काही फूटपाथचे काम अर्धवटच सोडून कंत्राटदाराने पळ काढला. त्यामुळे रहिवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.सहा वर्षांपासून चेंबूरच्या आर. सी. मार्गावर मोनो रेल्वेचे काम सुरू होते. मोनोच्या पिलरसाठी रस्त्याच्या मधोमध पत्रा लावल्याने रस्ते अरुंद झाले होते. या कामामुळे येथील फूटपाथची दयनीय अवस्था झाली. पादचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, पालिकेने तत्काळ फूटपाथ बांधले. मात्र, युनियन बँकसमोरील फूटपाथ कंत्राटदाराने गायब करून टाकला आहे. या ठिकाणी केवळ मॅनहोलची झाकणे शिल्लक आहेत. त्यातच या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी असल्याने रहिवासी फूटपाथचा वापर करतात. फूटपाथच गायब झाल्याने पादचाऱ्यांना नाइलाजास्तव रस्त्यावरून जावे लागत आहे. याच मार्गावरील काही ठिकाणी तर दोन वर्षांत दोन वेळा नव्याने फूटपाथ तयार करण्यात आले. मात्र, युनियन बँकेसमोरील फूटपाथकडे पालिका आणि स्थानिक नगरसेवक लक्षच देत नसल्याने पादचाऱ्यांना याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय कंत्राटदाराने त्याचे काम संपवून पालिकेकडून बिल मात्र मंजूर करून घेतले. त्यामुळे पालिकेने अशा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)