Join us

मुंबईकरांचे डोके ठिकाणावर आहे का? हेल्मेटचे अनेकांना वावडे, प्रतिदिन तीन हजार जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 3:28 AM

मुंबईकरांना हेल्मेटचे वावडे असल्याचे चित्र मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

मुंबई :

मुंबईकरांना हेल्मेटचे वावडे असल्याचे चित्र मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मुंबईत दिवसाला तीन ते चार हजार जणांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दहा दिवसांत ३० हजारांहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारवाईचा वेग वाढला आहे. गेल्या ६ वर्षांत मुंबईत (२०२१ पर्यंत) १३,४७५ अपघातांची नोंद झाली. यामध्ये २ हजार ६३९ जणांचा बळी गेला आहे. दारू पिऊन वाहन चालवणे, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन न करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक केल्यामुळे मृत्यूच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात घातलेल्या अटी निर्बंधामुळेही २०१९ पासून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी झाले. मुंबईत २०२१ मध्ये  २ हजार १९२ अपघातात ३४६  जणांचा बळी गेला आणि तब्बल दीड हजार जण गंभीर जखमी झाले. यामध्ये तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिवसाला तीन ते चार हजारांहून अधिक जणांवर विनाहेल्मेट कारवाई सुरू आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ९०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर जनजागृतीवरही पोलिसांकडून भर देण्यात आली आहे. 

 ...तर मुलगा वाचला असता भरधाव वाहनाच्या धडकेत मुलाच्या दुचाकीचा अपघात झाला. डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याने वेगावर नियंत्रण ठेवून हेल्मेट घातले असते तर तो वाचला असता. त्यामुळे प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करायला हवे.- मुलुंडमधील एक रहिवासी

टॅग्स :वाहतूक कोंडी