Join us

ठगांमुळे मुंबईतील अनेकांवर आली ‘घर घर’ करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 2:50 AM

स्वस्तात हक्काचे घर घेण्याच्या नादात अनेकांवर ‘घर घर’ करण्याची वेळ ओढावली आहे. कांदिवलीतील ताह्मणकर आजी-आजोबांसारखे अनेक जण ठगांच्या जाळ्यात ओढले जात आहेत.

मुंबई : स्वस्तात हक्काचे घर घेण्याच्या नादात अनेकांवर ‘घर घर’ करण्याची वेळ ओढावली आहे. कांदिवलीतील ताह्मणकर आजी-आजोबांसारखे अनेक जण ठगांच्या जाळ्यात ओढले जात आहेत. मुंबईत दिवसाआड अशा स्वरूपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे स्वस्तात घर घेत असाल, तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे.कांदिवलीतील ताह्मणकर आजी-आजोबांनी ट्रूली क्रियेटीव्हचा विकासक राजेंद्र बर्डे याच्या मोठ्या घराच्या आमिषाला बळी पडत हक्काचे घर विकले. बर्डेच्या जाळ्यात अडकलेल्यांपैकी एक असलेले तक्रारदार किशोर झारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९४ मध्ये बर्डेने राजेंद्र कुंज येथे राबवित असलेल्या प्रकल्पात स्वस्तात बड्या फ्लॅटचे स्वप्न दाखविले. त्यानुसार, झारेंसह अनेकांनी गुंतवणूक केली. सुमारे १०० हून अधिक जणांकडून त्याने पैसे घेतले. करारही झाला. मात्र २४ वर्षे उलटत आली तरी फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही.गुंतवणूकदारांनी त्याच्याविरुद्ध ग्राहक मंचात तक्रार दिली आहे. त्यावर गुंतवणूकदारांच्याच बाजूने निकाल लागला. दोन महिन्यांत बर्डेला घरे देण्यास सांगण्यात आले. पुढे त्याने राष्ट्रीय ग्राहक मंचात धाव घेत या आदेशालाही आव्हान दिले. तेथेही गुंतवणूकदारांच्याच बाजूने योग्य निकाल लागेल अशी आशा असल्याचे झारे यांनी सांगितले. आम्हाला फक्त घर हवे आहे. माझ्यासह अनेक कर्मचारी, स्थानिक रहिवासी रस्त्यावर आले आहेत. आम्ही आर्थिकगुन्हे शाखेकडेही गेल्या वर्षी तक्रार दिली.त्यानुसारही कारवाईही सुरू असल्याचे झारे यांनी सांगितले. काहींनी त्याच भागात झोपड्या बांधत, उदरनिर्वाह सुरू केला आहे.ज्येष्ठ ठरताहेत सॉफ्ट टार्गेटनिवृत्त झालेल्या वृद्धांना टार्गेट केले जात असल्याचे समोर येत आहे. वृद्धांना चांगल्या घरांचे स्वप्न दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला जातो. पुढे फसवणूक करणारी टोळी त्यांच्या निवृत्तिवेतनासह सर्वच रकमेवर डल्ला मारते. त्यामुळे कुठेही घर खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कागदपत्रांची शहानिशा करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून करण्यात येत आहे.म्हाडा, एमएमआरडीएच्या घरांचे स्वप्नमुंबईत घडलेल्या अन्य घटनांमध्ये मंत्र्याच्या कोट्यासह म्हाडा, एमएमआरडीएमध्ये स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होत असलेल्या घटनांचे प्रमाण अधिक आहे.त्यात आॅनलाइन घर खरेदीची भर पडत आहे. अनेकदा एकच घर दोन ते तीन जणांना विकल्याचे प्रकार यापूर्वी पश्चिम उपनगरात उघडकीस आले होते.

टॅग्स :मुंबई