घरवापसी गर्दीची; सुट्ट्या संपल्याने अनेक जण परतीच्या वाटेवर, रेल्वे-बस स्थानके फुलली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 07:50 AM2023-06-05T07:50:46+5:302023-06-05T07:51:13+5:30
उन्हाळी सुट्टीसाठी मे महिन्यात गावी गेलेले चाकरमानी हळूहळू परतण्यास सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उन्हाळी सुट्टीसाठी मे महिन्यात गावी गेलेले चाकरमानी हळूहळू परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे, बसस्थानकांवर गर्दी होऊ लागली आहे. रेल्वे अथवा बस येत नाही तोच अवघ्या काही वेळेत त्या भरूनही जात आहेत. त्यामुळे जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते आहे.
जूनमध्ये शाळा सुरू होत असून त्याआधी घरी परतण्याची चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. रेल्वे, बस आणि ट्रॅव्हल्सने हे चाकरमानी परतीच्या प्रवासाकडे लागले आहेत. सर्वत्र वाढता उष्मा असल्याने पर्यटकांसह चाकरमान्यांची विसाव्यासाठी आपल्या मूळ गावी, कोकणाकडे, पर्यटनस्थळी धाव घेतली. महिनाभर आपल्या गावाकडे राहण्याचा आनंद घेतल्यावर आता मुलांच्या शाळा, कॉलजेच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने, तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीची लगबग असल्याने परतीच्या प्रवासासाठी झुंबड उडत आहे. अशातच महिलांना एसटीतील हाफ तिकीट सवलती नंतर एसटीच्या सर्व गाड्याही फुल्ल धावत आहेत.
दुसऱ्या बाजूला वाढत्या गर्दीनुसार बस सोडण्यावर भर दिला जात आहे. परंतु, अनेक मार्गांसाठी बस वेळेवर येत नसल्यामुळे प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावे लागत आहे.
दोन महिने आधी तिकीट आरक्षण करूनही ३०० ची वेटिंग
रेल्वेच्या तत्काळ तिकिटासाठी रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडक्यांवर सकाळी ६ वाजल्यापासून रांगा लावल्या जातात. त्यातूनही नंबर लावण्यावरून वाद होताना आढळून येत आहे. सकाळी ११ वाजता तत्काळचे तिकीट द्यायला सुरू होते. मात्र पहाटेपासून रांग लागत असल्याने अक्षरशः रेल्वे स्थानकांवर झुंबड उडाल्याचे दृश्य दिसून येत आहे. कोकणातील गाड्यांचे सांगायचे झाले तर पहाटे सुटणारी दिवा पॅसेंजर असेल वा इतर मध्य रेल्वेच्या गाड्या सर्व हाऊसफुल्ल धावत आहेत. एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण २ महिने आधी करूनही १०० ते अगदी ३०० पर्यंत तिकीट वेटिंग दाखवत आहेत.
दरवर्षी सुट्ट्यांमध्ये गाड्या फुल्ल असतात. रेल्वे कडून योग्यप्रकारे नियोजन केले जात नाही. सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नाही दोन ते तीन महिने या प्रवाशांचे पैसे रेल्वे वापरते. रेल्वे अधिकारी आणि दलाल यांचे लागेबांधे असल्यामुळे हे घडत आहे. - नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ.