कोकणातील रेल्वे गाड्यांत अनेक जण अडकले; प्रवाशांना मुंबईत सोडण्यासाठी एसटीकडून खास बसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 03:04 PM2024-07-15T15:04:59+5:302024-07-15T15:06:56+5:30
सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली , देवगड आगारातून बसेसची व्यवस्था करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
ST bus ( Marathi News ) : मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणात दरड कोसळण्याच्या घटना घडत असून कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. दिवाणखवटी येथे बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मांडवी एक्सप्रेस आणि दिवा पॅसेंजर यातील प्रवासी अडकले असून या प्रवाशांना मुंबई येथे सोडण्यासाठी रेल्वे उपप्रबंधक यांनी एसटीकडे विशेष बस सोडण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार आता एसटी महामंडळाकडून विशेष बस पुरवण्यात येत आहेत.
रत्नागिरी स्टेशनवर ४० बस, चिपळूण स्टेशनवर १८ बस आणि खेड स्टेशनवर १० बसेस पाठवण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार मुंबईकडे जाणाऱ्या पुढील रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे स्टेशनवर आहेत.
१. सावंतवाडी - गरीब रथ
२. कुडाळ - मंगला एक्स्प्रेस
३. कणकवली - मंगलोर एक्स्प्रेस
४. वैभववाडी - मत्स्यगंधा एक्स्प्रेस
दरम्यान, यापैकी सावंतवाडी येथे थांबलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी १६ बसेसची मागणी रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. कणकवली येथे थांबलेल्या रेल्वेतील प्रवाशांसाठी १७ बसेसची मागणी करण्यात आलेली आहे . या सर्व बसेस मुंबई येथे पाठवायच्या आहेत. त्याप्रमाणे सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली , देवगड आगारातून बसेसची व्यवस्था करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोकण रेल्वेवर काय आहे स्थिती?
कोकण रेल्वे मार्गावर गेल्या आठवड्यात पेडणे बोगद्यात चिखल आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. चिखलमाती काढून रेल्वेसेवा गुरूवारी (दि.११) रात्रीपासून सुरळित सुरू झाली असताना पावसाने रविवारपासून (दि.१४) पुन्हा ठप्प झाली. खेडजवळील दिवाणखवटी स्थानकाजवळ बोगद्याच्या तोंडावरच दरड कोसळल्यामुळे रूळावर दगड मातीचा ढीग जमा झाला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली.