देशात अनेक गड उद्ध्वस्त झाले, बावनकुळेंचं पवारांच्या बारामतीत सूचक विधान!; रणनीतीही सांगितली...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:04 AM2022-09-06T11:04:17+5:302022-09-06T11:09:07+5:30
राजकारणात गड वगैरे कुणाचा नसतो. अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाचा गड किंवा वर्चस्व कधीच कायम राहत नाही.
बारामती-
राजकारणात गड वगैरे कुणाचा नसतो. अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाचा गड किंवा वर्चस्व कधीच कायम राहत नाही. वेळेनुसार ते बदलत असतं, असं सूचक विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते सध्या 'मिशन बारामती'च्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या दृष्टीनं पक्ष बळकटीकरणासाठी कामाला लागला असल्याचं सांगितलं. तसंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
"येणाऱ्या लोकसभा असो किंवा विधानसभा असो भाजपा आणि शिवसेना एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरं जाईल. यात भाजपा-शिवसेना युतीनं राज्यात ४५ हून अधिक लोकसभा आणि २०० हून अधिक विधानसभा जागा निवडून देण्याचं ठरवलं आहे. आम्हाला विश्वास आहे की जनता धोकेबाजांना बाजूला सारेल आणि खरे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मदत करेल. देशात अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. जेव्हा संघटन मजबूत होतं तेव्हा संघर्ष निर्माण करण्याची ताकद निर्माण होते आणि चांगले चांगले गड उद्ध्वस्त होतात हा देशाचा इतिहास आहे. गड कुणाचा राहत नाही. कुणाचं वर्चस्व राहत नाही. वेळेनुसार ते बदलत असतं. आम्ही ठरवलं आहे की आमची ताकद एवढी वाढवायची की आमच्याच भरवशावर बारामतीची सीट निवडून आणायची. त्यानुसार आम्ही बैठका घेत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की संपूर्ण देशात ४०० हून अधिक बारामतीसह भाजपाचे उमेदवार लोकसभेला निवडून येतील. याची तयारी आम्ही आतापासूनच सुरू केली आहे", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
निर्मला सीतारामण बारामतीत तळ ठोकणार
बारामती लोकसभा मतदार संघाकडे लक्ष देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात निर्मला सीतारामण बारामतीत ६ ते ७ वेळा येणार आहेत, अशी माहिती देखील बावनकुळे यांनी दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकासाठी सीतारामाण बारामतीत ठाण मांडून बसतील अशी शक्यता आहे. पवारांना धक्का देण्यासाठी भाजपानं आता बारामतीवर लक्ष केंद्रीत केल्याचं पाहायला मिळत आहे.