मुंबई : मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचा रखडलेला पुनर्विकास, बंद पडलेले पालिकेचे महात्मा जोतिबा फुले रुग्णालय, कांजूर डम्पिंगची दुर्गंधी, त्यासाठी सुरू असलेला न्यायालयीन लढा, मोठ्या संख्येने उभ्या राहणाऱ्या टॉवरमुळे पायाभूत सुविधांवर पडणारा प्रचंड ताण, नियम न पाळता होत असलेल्या बांधकामांमुळे वाढलेले प्रदूषण, सार्वजनिक मैदानांची दुरवस्था, पाणीपट्टीची होणारी चुकीची वसुली, वारंवार फुटणारी जुन्या ड्रेनेज लाइन्स अशा एक ना अनेक समस्यांची जंत्री विक्रोळीकरांनी ‘लोकमत’पुढे मांडली.
विविध भागांतील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि सरकारदरबारी त्यांचे निराकरण करण्यासाठी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विक्रोळीच्या कन्नमवार नगरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्थानिकांनी भेडसावणाऱ्या नागरी समस्यांचा पाढा वाचला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
सरकारच्या नव्या जी. आर.मुळे मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास कसा रखडला आहे, याविषयी बोलताना उपस्थितांनी समाजकल्याण खात्यावर टीकेची झोड उठवली. पालिकेचे महात्मा जोतिबा फुले रुग्णालय बंद पडल्याने आरोग्यसेवेची झालेली परवड हाही मुख्य मुद्दा मांडण्यात आला.
कांजूर डम्पिंग ग्राउंडविरोधात तीव्र संताप यावेळी दिसून आला. डम्पिंग ग्राउंडमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, दुर्गंधीने लोक त्रस्त आहेत. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड तात्काळ बंद करावे, अशी एकमुखी मागणी उपस्थितांनी केली.
विक्रोळी, कन्नमवारनगर आणि टागोरनगर परिसरांत सध्या पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. बांधकामे करताना विकासक नियम पाळत नसल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
रस्त्यांची कामे करताना विविध सेवावाहिन्या सातत्याने फुटतात, जुन्या ड्रेनेज लाइनही फुटतात. त्यामुळे होणाऱ्या त्रासाकडेही लक्ष वेधण्यात आले.
सार्वजनिक मैदानांमध्ये विविध सुविधांचा अभाव, या मैदानांमध्ये मद्यप्यांकडून होणाऱ्या पार्ट्या याविषयी नाराजीचा तीव्र सूर उमटला.
मागासवर्गीय सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत सामाजिक न्याय विभाग उदासीन आहे. या विभागाला काहीही देणे-घेणे पडलेले नाही. सामाजिक न्याय विभाग हा सामाजिक अन्याय विभाग झाला आहे. - जनार्दन लवंगारे
कन्नमवारनगर आणि टागोरनगर येथील मैदाने मद्यप्यांनी ताब्यात घेतली आहेत. या ठिकाणी सर्रास मद्यपान केले जाते. टागोरनगरच्या राजर्षी शाहू मैदानात तर ही मंडळी मोठ्या प्रमाणावर असतात. पोलिसांची एक गाडी गस्त गस्त घालते आणि निघून जाते; पण कारवाई होत नाही.- राजेश कलोते