मुंबई : स्वसंरक्षणासाठी मुंबईतही अनेकांची शस्त्र परवान्यासाठी धडपड सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. मुंबईत जवळपास दोन हजार जणांनी परवाने काढले असल्याचे समजते. यात लोकप्रतिनिधी, व्यापारी, ठेकेदार आणि डाॅक्टर तसेच प्रतिष्ठित व्यक्तींंचा समावेश आहे.
स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हर आणि पिस्टल अशा दोन बंदुकींना परवाने देण्यात येतात. हे शस्त्र सार्वजनिक ठिकाणी काढता येत नाही. केवळ आत्मसंरक्षणासाठी शेवटचा पर्याय म्हणून या शस्त्राचा वापर करता येतो. ज्या शस्त्राला परवाना मिळाला आहे ते हरविता येत नाही. त्याचा दहशत पसरविण्यासाठी उपयोगही करता येत नाही. त्यामुळे अशा शस्त्रांना जपून वापरावे लागते. यात अनेक अर्ज आले. मात्र, प्रशासनाने सर्व बाबींची शहानिशा केल्यानंतर यातील बहुतांश अर्ज नाकारण्यात आले आहे.
मुंबईत जवळपास दोन हजार जणांनी परवाने काढल्याचे समजते आहे. मात्र, याबाबत मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी अधिकृत आकडेवारी देण्यास नकार दिला.
शस्त्र परवाना काढायचा कसा?
शस्त्र परवानाबाबतचा अर्ज येताच तो अर्ज संबंधित पोलीस ठाणे येथे पाठविण्यात येतो. संबंधित पोलीस ठाणे त्या अर्जाची चौकशी करून त्याचा अहवाल परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त यांच्याकडे पाठविला जातो. ते अर्जदाराची मुलाखत घेऊन त्याचा अहवाल सादर करतात. सदर अर्जाबाबत सहमती झाली की परवाना दिला जातो.
किती महिन्यात मिळतो परवाना?
नवीन शस्त्र परवाना प्राप्त करण्यासाठी किमान दोन महिने लागतात.
अधिकारी वर्गातही वाढती क्रेझ
शस्त्र परवाना मिळविण्यासाठी आता सरकारी अधिकारीही धडपड करताना दिसत आहेत.